

नाशिक : सोने- चांदी हे मौल्यवान धातू स्वस्त होतील, ही ग्राहकांची अपेक्षा आता फोल ठरताना दिसून येत आहे. सोने दराने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोने प्रतितोळा ९० हजारांच्या पार गेले आहे. अवघ्या दोनच महिन्यांत सोने तब्बल १० हजारांनी वधारले असून, दरवाढीची गती बघता दसरा, दिवाळी अगोदरच सोने लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आजचे सोने-चांदीचे दर असे...
२४ कॅरेट - प्रतितोळा - ९० हजार ५०० रु.
२२ कॅरेट - प्रतितोळा - ८३ हजार ३०० रु.
चांदी - प्रतिकिलो - एक लाख तीन हजार रु.
(सर्व दर जीएसटीसह)
गतवर्षी केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात लक्षणीय ९ टक्के कपात केल्याने, आयात शुल्क १५ वरून ६ टक्क्यांवर आले होते. त्यामुळे सोने दर घटून ७५ हजारांवरून थेट ७० हजारांपेक्षा कमी प्रतितोळ्यावर आले होते. त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये फारशी वाढ न होता, दर आणखी कमी होतील, अशी अपेक्षा ग्राहकांकडून वर्तविली जात होती. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या घडामोडींमुळे दर अल्पावधीतच पूर्वस्थितीत आले. पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच सोने दरातील तेजीने प्रचंड वेग धरल्याने, अवघ्या दोनच महिन्यांत सोने १० हजारांनी वधारले.
गेल्या ८ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोने ७९ हजार ९७० रुपये प्रतितोळा, तर २२ कॅरेट सोने ७३ हजार ५८० रुपये प्रतितोळा इतका दर होता. गुरुवारी २४ कॅरेट प्रतिताेळा ९० हजार ५०० रुपयांवर पोहोचल्याने, अवघ्या दोन महिन्यांत दरात तब्बल १० हजार ५३० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. तर २२ कॅरेट सोने ८३ हजार ३०० रुपयांवर दर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी बघता, सोने दर आणखी मोठी उसळी घेण्याची शक्यता आहे.
सोने दराप्रमाणेच चांदी दरातही मोठी तेजी बघावयास मिळत आहे. चांदीने पुन्हा एकदा लाखाचा टप्पा पार केला असून, चांदी आता प्रतिकिलो एक लाख तीन हजार रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या ५ मार्च रोजी चांदीचा दर ९८ हजार रुपये प्रतिकिलो इतका होता. अवघ्या दहा दिवसांत त्यात पाच हजारांची वाढ हाेऊन दर लाखाच्या पार गेला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी बघता सोने-चांदी दर घटण्याची शक्यता कमी आहे. आताचा सोने दरवाढीचा वेग बघता पुढच्या काही दिवसांतच लाखाचा टप्पा पार करेल, अशी स्थिती आहे. गुंतवणुकीसाठी साेने खरेदीची संधी आहे.
गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.