Gold Rate Hike | अक्षय्य तृतीया मुहूर्तावर सोने 'लाख' मोलाचे?

दरवाढीचा वेग ३८ टक्क्यांवर : दहा दिवसांत आठ हजारांची वाढ
Gold Rate Hike
Gold Rate Hike Pudhari News
Published on
Updated on

नाशिक : अमेरिका-चीनमधील धगधगत्या व्यापार युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात भडका उडला असून, दरवाढीचा वेग विक्रमी असल्याने, येत्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने लाखाचा टप्पा गाठण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

Summary

सोने दरवाढीचा वेग ३८ टक्क्यांवर पोहोचला असून, मागील दहा दिवसांत सोन्याच्या दरात विक्रमी आठ हजार १९० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. गुरुवारी (दि.१७) सोने दराने उच्चांकी ९७ हजार ९५० रुपयांचा दर नोंदविताना लाखाच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे.

Summary

असे आहेत दर

  • २४ कॅरेट - प्रतितोळा - ९७ हजार ९५०

  • २२ कॅरेट - प्रतितोळा - ९० हजार १२०

  • चांदी - प्रतिकिलो - ९८ हजार ९००

  • (सर्व दर जीएसटीसह)

साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया हा सण ३० एप्रिल रोजी साजरा केला जाणार असून, या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानली जाते. मात्र, सोने-चांदीतील दरवाढ ग्राहकांसमोर मोठा चिंतेचा विषय बनल्याने, या मुहूर्तावर खरेदीचा वेग काहीसा मंदावण्याची भीती सराफ व्यावसायिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मागील दहा दिवसांमध्ये ज्या गतीने सोने दरात वाढ होत आहे, त्यावरून पुढच्या काही दिवसांतच सोने लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. गेल्या ८ एप्रिल रोजी सोने दर २४ कॅरेट प्रतितोळा ८९ हजार ७६० रुपये इतका होता. गुरुवारी (दि. १७) दर २४ कॅरेट प्रतितोळा ९७ हजार ९५० रुपयांवर पोहोचला. अवघ्या दहा दिवसांत दरात आठ हजार १९० रुपयांची वाढ झाल्याने, दरवाढीचा हा वेग आतापर्यंतचा उच्चांकी वेग ठरला आहे.

दुसरीकडे चांदीदेखील लाखाच्या दिशेने पुन्हा एकदा आगेकूच करीत असून, गुरुवारी दर प्रतिकिलो ९८ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहेत. दहा दिवसांपूर्वी चांदी ९४ हजारांवर होती. चांदीतदेखील दहा दिवसांत चार हजार ९०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीतील दरवाढीचा वेगदेखील मोठा आहे. दरम्यान, यापूर्वी चांदीने उच्चांकी एक लाख पाच हजारांचा दर नोंदविला आहे.

नववधू पित्यांची वाढली चिंता

सोने-चांदीच्या वाढत्या दराने नववधू पित्यांची चिंता वाढविली आहे. सध्या लग्नाचा सीझन असून, चालू एप्रिल महिन्यात दहा तिथी आहेत. दहापैकी आठ तिथी या महिनाअखेर असल्याने, सोने-चांदी खरेदीसाठी यजमानांची सराफ बाजारात गर्दी दिसत असली तरी, हात आखडता घेत खरेदी केली जात आहे. तर पुढील मे महिन्यात लग्नाच्या तब्बल १५ तिथी असून, दरांनी लाखाचा टप्पा गाठण्याअगोदर सोने-चांदी खरेदीसाठी यजमानांकडून गर्दी होत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. सर्वसामान्य कुटुंबामधील लग्नघरी मात्र सोने-चांदी खरेदी करणे वधुपित्याला फारच अवघड होत असल्याचे चित्र आहे.

अमेरिका-चीन यांच्यात व्यापार युद्ध तीव्र होत असल्याने त्याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होत आहे. सोने-चांदी दरवाढीचा वेग पुढील काही दिवसांत असाच राहिल्यास, अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमती लाखाचा टप्पा गाठू शकतात. व्यापार युद्ध काहीसे शिथिल झाल्यास, दर स्थिर किंवा कमी होऊ शकतील.

गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news