

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरांत उच्चांकी वाढ झाली होती. एक लाखांवर गेलेलं सोनं मे महिन्याच्या सुरुवातीलाच अक्षय तृतीयाच्या मृहुर्तावर तब्बल 7 हजार रुपयांनी स्वस्त झालं होतं. या आठवड्यात मात्र सोन्याला पुन्हा झळाळी आल्याचे चित्र आहे.
नाशिक सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरांत वाढ झाली आहे. बुधवार (दि.7) आज पुन्हा 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 800 रुपयांनी महाग झालं आहे. त्यामुळे आज तोळ्याला 97 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेटसाठी 89 हजार 310 रुपये मोजावे लागतील.
सोमवारी (दि.5) रोजी सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. तेव्हा 100 रुपयांनी सोन्याचे दर महागले होते. तर मंगळवारी (दि.6) रोजी तब्बल 3 हजार रुपयांनी सोन्याचे दर वाढले होते. बुधवार (दि.7) रोजी आज पुन्हा 800 रुपयांनी सोनं वधारले आहे. त्यामुळे 3 दिवसांत सोन्याच्या दरांत 3,900 रुपयांची वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे.
दुसरीकडे चांदीच्या दरांत मात्र बुधवार (दि.7) रोजी आज 100 रुपयांच घट झाली असल्याने प्रतिकिलो चांदीसाठी 96 हजार 800 रुपये मोजावे लागतील. सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा फटका सराफा बाजाराला बसत आहे. उन्हाळी सुट्टींच्या दृष्टीकोनातून काढल्या जाणाऱ्या ऐन लग्नसराईत सोन्याला पुन्हा झळाळी आली असून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.