

नाशिक : सोने-चांदी दरातील वाढीचे सत्र सुरूच असून, गत आठवडा मात्र काहीसा चढउताराचा गेल्याचे दिसून आले. कधी सोने दरात वाढ, तर कधी घसरण झाल्याने, ग्राहकांमध्येही गोंधळाचे चित्र बघावयास मिळाले. दुसरीकडे चांदीने मोठी झेप घेतली असून, चांदी पुन्हा एकदा लाखाच्या उंबरठ्यावर दाखल झाली आहे.
गत आठवड्यात सोमवारी ७६० आणि मंंगळवारी ६०० रुपयांनी साेने महागले होते. त्यानंतर बुधवारी ४९०, तर गुरुवारी ३३० रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. सोन्यातील सातत्याच्या चढउतारामुळे मात्र ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण दिसून आले. वास्तविक मागील काही दिवसांपासूनच सोन्याच्या दरात चढउतार बघावयास मिळत आहे. मात्र, हा चढउताराचा सिलसिला ८५ हजारांच्या पुढेच असल्याने, सोने ८० हजारांच्या खाली येण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. तसेच यंदाच्या दिवाळी, दसऱ्यात सोने दर लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोने-चांदीचे दर अवलंबून असून, ज्या पद्धतीने जागतिक स्तरावर घडामोडी घडत आहेत, त्यावरून सोने एक लाखाच्या पार जाण्याची दाट शक्यता सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सोने दरात चढउताराचे सत्र सुरू असताना, चांदीचे दर मात्र सुसाट असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गत आठवड्यात चांदी तब्बल २१०० रुपयांनी महागली. सोमवारी आणि बुधवारी चांदी एक हजारांनी वधारल्यानंतर गुरुवारी त्यात शंभर रुपयांची वाढ झाली. आठवडाभरापूर्वी चांदी पाच हजारांनी स्वस्त झाली होती. मात्र, आता चांदीचे दर वाढले असून, पुन्हा एकदा लाखाच्या उंबरठ्यावर चांदी पोहाेचली आहे.
२४ कॅरेट : ८७ हजार ७४० रुपये तोळा
२२ कॅरेट : ८० हजार ४३० रुपये तोळा
चांदी : प्रतिकिलो ९९ हजार शंभर रुपये