

नाशिक : शिवसेना उबाठा गटाला आधीच बर्यापैकी हादरा दिल्यानंतर आता भाजपने आपल्या सत्ता सहभागी मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही धक्का देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे सेनेतील नाराज माजी खासदार हेमंत गोडसे काही माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत. शिंदे गटात पक्षशिस्त नसल्याची उघड टीका खुद्द गोडसे यांनी केल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. मात्र, आपण अद्याप भाजपमध्ये जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर गोडसे हे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर झाले आहेत. शिंदे गटातील गटबाजीमुळे ते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात गोडसे यांच्याशी चर्चा केली असता, शिंदे गटात पक्षांतर्गत शिस्त नसल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही.
एकनाथ शिंदे यांनी उत्कृष्ट काम केल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, मात्र पक्षात शिस्त नाही, पदवाटप आणि संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये योग्य व्यवस्थापन होत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षात तयारी आणि शिस्त आवश्यक आहे. अन्यथा अपेक्षित यश मिळणार नाही. गुणवत्तेवर आधारित नियुक्त्या झाल्यास गटबाजी टाळता येईल. यासंदर्भात अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे विषय मांडला असून ते निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे, असे गोडसे यांनी सांगून भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले.
हेमंत गोडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षाचे युवानेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. खा. शिंदे यांनी गोडसे यांना चर्चेसाठी ठाण्यात पाचारण केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठी आपल्या नाराजीची दखल घेतील. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनाही न्याय देतील, अशी अपेक्षा गोडसे यांनी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे पक्षाचे मुख्य नेते असले तरी ते एकटे काम करू शकत नाहीत. त्यांचा भार कमी केला पाहिजे, असे सांगत जिल्ह्यातील मंत्र्यांनी त्या-त्या संघटनेत लक्ष घालायला पाहिजे, तर संघटना मजबूत होते, असे नमूद करत गोडसे यांनी मंत्री दादा भुसेंवर अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली आहे.