

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
तपोनानातील गोदावरी-कपिला संगम, दसक परिसर आणि टाकळी या तिन्ही मुख्य ठिकाणी गोदावरी नदीपात्रातील ऑक्सिजनची पातळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात 'शून्य' नोंदवली गेल्याचे वृत्त दै. 'पुढारी'त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित शासकीय यंत्रणांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
गोदावरी नदीचे प्रदूषण वर्षानुवर्षे वाढत असताना नियंत्रण मंडळाने किती अंमलबजावणी झाली? याचा कोणताही हिसाब जनतेसमोर नाही, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या बैठकांचे इतिवृत्त, पाहणी अहवाल, घेतलेले निर्णय आणि त्यासाठी खर्चाी पडलेल्या निधीचा विनीयोग यांची संपूर्ण श्वेतपत्रिका सार्वजनिक करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
इतक्या वर्षांत नेमके काय केले? विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने नक्की किती बैठका घेतल्या? त्या बैठकांमध्ये कोणते धोरणात्मक निर्णय झाले? आणि त्या निर्णयांची प्रत्यक्ष जमिनीवर किती अंमलबजावणी झाली? याचा कोणतीही हिसाब जनतेसमोर नाही, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
गोदावरीचे हे भीषण प्रदूषण एका दिवसात झालेले नसून, वर्षानुवर्षे बैठका, चर्चा आणि पाहणी दौऱ्यांचे केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या नियंत्रण यंत्रणांच्या अकार्यक्षमतेमुळेच नदीचा नैसर्गिक श्वास पूर्णपणे थांबला आहे, असा थेट आरोप निसर्गसेवक युवा मंचाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी केला आहे.
गोदावरी गटाराचे पाणी वाहून नेणारी नदी बनली आहे. साहजिकच त्यामधील सेंद्रिय घटक हे अति प्रमाणात वाढल्याने व ते जैवविघटनशील असल्याकारणाने ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी होत चालले आहे. नद्यांचा ह्हास मानवाला देखील विनाशाकडे नेतो हे इतिहासााने दाखवून दिलेले आहे. त्यातूनही जर काही शिकायचे नसेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत.
— अमित कुलकर्णी, अध्यक्ष, निसर्गसेवक युवा मंच