Godavari river : गोदामाई पुन्हा पात्राबाहेर

गंगापूर धरणातून सात हजार क्यूसेकने विसर्ग; बुधवारचा आठवडे बाजार बंद
Godavari river flood situation
गोदामाई पुन्हा पात्राबाहेर pudhari photo
Published on
Updated on

नाशिक : वरुणराजाच्या पुनरागमनाने गोदावरी काठावर पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक लक्षात घेऊन, पाटबंधारे विभागाने गंगापूर धरणातून रात्री 8 वाजता सात हजार 372 क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवला. परिणामी, गोदामाई पात्राबाहेर पडून दुथडी वाहू लागली आहे.

तीन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भासह, मुंबई, पुणे, नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पाठोपाठ नाशिक शहर आणि जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू झाली आहे. मंगळवारी (दि.19) रात्रीपासूनच पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली. बुधवारी सायं. 5 पर्यंत पावसाचा जोर कायम होता.

सायं. 5 नंतर तासभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा झड लागली. दिवसभर जलधारा कोसळत राहिल्याने जनजीवनावर परिणाम झाला. गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने सध्या बाजारात खरेदीची धूम आहे. भर पावसातही बाजारात चैतन्य दिसून आले. पंचवटी, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, भद्रकाली, शालिमार आदी परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करणे मुश्किल झाले होते.

सूचनेकडे दुर्लक्ष; वाहने अडकली पुरात

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार प्रशासनाने खबरदारी म्हणून बुधवारचा आठवडे बाजार नदीपात्रात किंवा पात्रालगत भरवण्यात येऊ नये, असे आवाहन केले होते. त्यानुसार विक्रेत्यांनी गणेशवाडीच्या बाजूला बाजार भरविला. दरम्यान, प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलेल्या वाहनधारकांची वाहने गोदावरीची पूरपातळी वाढल्याने रामकुंड परिसरातील पार्किंग परिसरात अडकल्याचे दिसून आले.

शाळांना नियमित वेळेअगोदरच सुटी

हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर नाशिक महापालिकेने शाळा व्यवस्थापनास विशेष सूचना दिल्या होत्या. सुटी घोषित नसली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात पालकांना सतर्क करण्यात आले. शिवाय, शाळांनी नियमित वेळेपेक्षा अर्धा तास आधी सुटी दिली.

मुंबई-पुण्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुटी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये मंगळवारपासून पावसाने जोर पकडला असला तरी परिस्थिती चिंताजनक नसल्याने, शाळांना सुटी दिली नव्हती. मात्र विशेष खबरदारी बाळगल्याचे दिसून आले. शाळा व्यवस्थापनाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पालकांसाठी विशेष सूचना जारी केल्या. विद्यार्थ्यांना शाळेत आणणे आणि घरी नेण्याची जबाबदारी पालकांनी स्वीकारावी अशा सूचना संदेशाद्वारे दिल्या गेल्या. परिणामी, स्कूल व्हॅनबरोबरच पालकांनादेखील शाळेत हजेरी लावावी लागली.

पालकांचे मेसेज : शाळांच्या आवाहनानुसार पालकांनी आपले पाल्य घरी पोहोचल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दिली. काही पालकांनी मुसळधार पावसामुळे मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतल्याने हजेरीत घट झाली.

त्र्यंबकला संततधार; ग्रामीण बससेवा प्रभावित

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे त्र्यंबकेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शाळा व महाविद्यालयांतील उपस्थिती लक्षणीय घटली असून, वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.

पालघर जिल्ह्यातून येणारी बससेवा ठप्प झाली. तर पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील काही बसफेर्‍या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, काही फेर्‍या अर्ध्यावरूनच परत फिरवाव्या लागल्यात. त्यामुळे तालुका व शहर परिसरातील दैनंदिन जीवनमान अक्षरशः ठप्प झाले आहे. मध्यंतरी पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यावर आटलेले धबधबे व प्रवाह आता पुन्हा दणाणून वाहू लागले आहेत.

मंगळवारी अजा एकादशीच्या निमित्ताने पार पडलेल्या रामवारी सोहळ्यास हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. मात्र बुधवारी सततच्या पावसामुळे शहरातील गर्दी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. श्रावण महिना आता दोन दिवसांत संपत असल्याने, अमावास्येला होणारी गर्दी वगळता पुढील काळात भाविकांची संख्या हळूहळू घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक पुन्हा जलमय; 209 ब्लॅक स्पॉटची ‘पोलखोल’

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे महापालिकेच्या पावसाळी पूर्वतयारीची ‘पोलखोल’ झाली आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते जलमय झाले. मे महिन्यातील अवकाळी पावसानंतर बांधकाम विभागाने सहाही विभागांतील 209 ब्लॅक स्पॉटवर पाणी निचर्‍याची उपाययोजना केल्याचा महापालिकेचा दावा असला तरी, बुधवारी (दि.20) याच ठिकाणी पूर्ववत डबके दिसल्याने उपाययोजना फक्त कागदोपत्री झाल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले व गटारांची साफसफाई केली जाते. ठेकेदारांमार्फत एप्रिल व मे महिन्यात ही कामे केली जातात. मात्र यंदा ठेकेदार निश्चित न केल्याने वेळेत ही कामे होऊ शकली नाहीत आणि याचा फटका मे महिन्यातील अवकाळी पावसात नाशिककरांना बसला. नंतर महापालिकेने जून - जुलैत पावसाळीकामे पूर्ण केल्याचा दावा केला; पण बुधवारी झालेल्या संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

शहरात सुमारे तीन लाख 63 हजार 22 मीटर लांबीचे पावसाळी गटार पाइप असून, त्यावर 13 हजार 946 चेंबर आहेत. शहरात एक लाख 21 हजार मीटर लांबीचे पावसाळी नाले असून, त्यातील 50 हजार 926 मीटर लांबीची साफसफाई करणे आवश्यक होते. नालेसफाईची कामे दर्जेदार न झाल्याने पाऊस पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी, पाणी तुंबून तळ्यांचे स्वरूप आले.

या ठिकाणी साचले पाणी

शहराची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणार्‍या दहीपूल, मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, सारडा सर्कल, अशोकस्तंभासह महापालिका परिसर, गंगापूर रोड, कॉलेजरोड या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. नाशिकरोड, पंचवटी, सिडकोतील रस्त्यांवरही पाणी साचून नागरिक, वाहनधारकांना मार्गक्रमण करताना अडचणी आल्या. बांधकाम विभागाने शहरातील सहा विभागांमध्ये सर्वेक्षण करत 209 पाणी साचण्याचे स्पॉट शोधून काढले होते. त्या ठिकाणी उपाययोजना केल्याचा दावा होता. परंतु, बुधवारी यातील बहुतेक ठिकाणी पाणी साचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news