

सिन्नर (नाशिक) : शेळी ही गरीबाची गाय आहे. अडचणीच्या वेळी शेळीपालनातून सहज आर्थिक मदत मि ळते. युवा मित्रने हजारो महिलांना एकत्र जोडून शेळीपालनाद्वारे आत्मसन्मानाने जगायला शिकवले. महिलांना शेळीपालन व्यवसायातून सक्षम करण्याचे कार्य संस्था करत आहे, असे प्रतिपादन युवा मित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी केले.
युवा मित्रच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त बजाज फायनान्स व रंभा फिलांथ्रोपी फाउंडेशन यांच्या सहकार्यातून लोणारवाडी येथे महिला शेतकरी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पशुसंवर्धन सहायक आयुक्त संजय थोरात, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. ज्ञानदा जाधव, पशुधन विकास अधिकारी योगेश दुबे, डॉ. अवंतिका उदगीरकर, डॉ. विकास चत्तर, रंभा फिलांथ्रोपी फाउंडेशनचे रणजित पुजारी, बिरुदेव चाणगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. महिला उपजीविका विकास प्रकल्पातील महिलांना प्रेरणा मिळावी म्हणून महिला मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे पोटे यांनी सांगितले.
शेळीपालनावर आधारित महिला उपजीविका विकास कार्यक्रम हा सिन्नर तालुक्यातील 100 आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर व राहता तालुक्यांतील 55 अशा एकूण 155 गावांमध्ये 15 हजार महिलांसमवेत राबविला जात असल्याचे पोटे यांनी सांगितले. यावेळी आयोजित यशस्वी महिलांच्या चर्चासत्राचे सूत्रसंचालन कृषी पत्रकार मुकुंद पिंगळे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात उत्कृष्ट शेळी, उत्कृष्ट गोठा आणि उत्कृष्ट करडू या स्पर्धांचा समावेश होता. पुरस्कारप्राप्त लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. युवा मित्र संस्थेतील कर्मचारी, महिला उपजीविका विकास शेळीपालन प्रकल्पातील पशुसखी आणि आर्थिक साक्षरता प्रकल्पात सखी म्हणून काम करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमस्थळी लाकडी आणि कलाकुसरीच्या शोभिवंत वस्तू, बचत गटांद्वारे तयार केलेली पापडांसह इतर खाद्यपदार्थांची दालने होती. तसेच, महिलांनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, धान्य, प्रक्रिया केलेली उत्पादने, सावित्रीबाई फुले शेळीपालन उत्पादक कंपनीची दूध उत्पादने, गांडूळ खत आणि बांबूपासून तयार केलेली उत्पादने प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
जिल्ह्यातील कृषी आणि कृषिपूरक क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या, प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून यशस्वी वाटचाल करणार्या छाया जगताप (मेंढी), अनिता गिते (मेंढी), भारती रनमाळे (लोहारे), अनिता दिघे (तळेगाव दिघे), सावित्रीबाई कोकाटे (हिवरे), शीला सांगळे (चापडगाव), संगीता पिंगळे (मातोरी), रत्नप्रभा वाघ (विंचूर), संगीता बोरस्ते (साकोरे मिग), ताराबाई पडोळ (सोनेवाडी बु.), मनीषा भगत (मुखेड) आणि वनिता बर्हे (घोरवड) या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
दुधावर प्रक्रिया उद्योग महिलांना शेळीपालनाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, शेळी विक्री व्यवस्था निर्माण व्हावी आणि या व्यवसायातून अधिक नफा मिळावा, यासाठी सावित्रीबाई फुले शेळीपालन उत्पादक कंपनी लि. स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून भारतातील पहिला शेळीच्या दुधावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे.