

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारने गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे व अवशेष अधिनियम, १९७८ अंतर्गत राज्यातील आणखी १५ प्राचीन स्मारके व पुरातत्त्व स्थळे 'संरक्षित' म्हणून घोषित केली आहेत. पुरातत्त्व विभागाने मार्चमध्ये याबाबत प्रस्ताव प्रसिद्ध करून नागरिकांकडून आक्षेप व सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर सरकारने अंतिम अधिसूचना जारी केली.
नव्याने संरक्षित करण्यात आलेल्या स्थळांमध्ये मळार गुहा (मळार), हात कात्रो खांबो (पे-लौरिनो नोवो, जुने गोवे), शिरदोण गुहा (शिरदोण), अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटचे अवशेष (चिमबल) आणि गोपक्कापट्टनम बंदराचा (गोवा वेल्हा) याचा समावेश आहे. याशिवाय बावळ्यांचे मोल (पीर्ल), बाळ्ळी मठ (बाळ्ळी), ससोर खड्डे येथील मंदिराचे अवशेष (कोडें), तामसुली गुहा (कांदोळी),
मर्दनगड किल्ला (कवळे), सूर्य मंदिराचे अवशेष आणि थडगी स्मारके (कुडणे) तसेच जॅक्वे गुहा (सांगे), खडकात कोरलेले तळे (दाबोळी) आणि श्री दामोदर मंदिराचे तळे (मडगाव) यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
या प्राचीन स्थळांना संरक्षित दर्जा देण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत सरकारकडे केली होती. या स्थळांना संरक्षित दर्जा मिळाल्यामुळे त्यांचे अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण आणि परवानगीशिवाय करण्यात येणारे संरचनात्मक बदल यापासून कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.
संबंधित स्थळांच्या परिसरात विकासकामे किंवा बदल करण्यासाठी अधिनियमातील तरतुदींनुसार आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे गोव्यातील ऐतिहासिक, पुरातत्वीय आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रयत्नांना अधिकृत कायदेशीर आधार मिळाला आहे.