

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाची युती अनेक वर्षांपासून आहे; मात्र काँग्रेस पक्षाने नेहमीच गोवा फॉरवर्डला द्वितीय स्थान देत शेवटपर्यंत झुलवत ठेवले आहे. शेवटच्या घटकेला तीन जागा गोवा फॉरवर्डला दिल्या. २०२२ मध्ये अशाच तीन जागा शेवटच्या क्षणी दिल्या; मात्र फातोर्डा वगळता इतर दोन जागा मांद्रे व मये गोवा फॉरवर्डला जिंकता आल्या नाहीत.
फातोर्डाची जागा ही विजय सरदेसाई यांनी स्वतःच्या कर्तृत्वामुळे जिंकली. यावळी सरदेसाई यांनी काँग्रेसची ही खेळी काँग्रेसवरच उलटवत काँग्रेसला 'चेकमेट' केले आहे. त्यामुळे तीन नव्हे पाच ते सहा जागा देतो; पण काँग्रेस सोबतयुतीत या, अशी मनधरणी काँग्रेस नेत्यांना करावी लागली आहे. एकूणच राजकारणात अनुभवी असलेल्या सरदेसाई यांनी काँग्रेस नेत्यांना त्यांच्या मागे येण्यास भाग पाडले आहे.
काँग्रेस प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणापर्यंत गोवा फॉरवर्डला झुलवत ठेवते. काँग्रेसचा हा कावेबाजपणा ओळखून यावेळी विजय सरदेसाई यांनी धूर्त खेळी करत काँग्रेसला बाजूला ठेवत आम आदमी पक्षाला सोबत घेऊन 'गोवा फर्स्ट' आघाडी स्थापन केली. त्यामुळे काँग्रेसचे नेते हादरले.
या माध्यमातून तिसरा फ्रंट स्थापन झाला आणि विधानसभा निवडणूक तिरंगी झाली तर तिसरा फ्रंट काँग्रेसचीच मते खाईल, भाजपला पुन्हा सत्ता मिळेल याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना झाली. ज्या गोवा फॉरवर्डला गेले वर्षभर युतीसाठी ताटकळत ठेवले जात होते त्या पक्षाला काँग्रेसची दारेच नव्हे तर खिडक्याही उघड्या असल्याचे विधान काँग्रेसच्या नेत्यांना करावे लागले आहे, यावरून त्यांची हतबलता स्पष्ट होते.
पूर्वी गोवा फॉरवर्ड काँग्रेसने लवकर युतीची बोलणी करावी, अशी हाक देत होता; परंतु आता काँग्रेस युतीसाठी गोवा फॉरवर्डची मनधरणी करताना दिसत आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीत यश
गोवा फॉरवर्डला जिल्हा पंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. विशेषतः दक्षिण गोव्यातील काही मतदारसंघांत चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे गोवा फॉरवर्डला जिथे जास्त मते मिळाली आहेत ते मतदारसंघ काँग्रेसने गोवा फॉरवर्डला सोडावेत, अशी अट आता गोवा फॉरवर्ड काँग्रेसला घालू शकतो.
सहा ते सात मतदारसंघ मागणार
यापूर्वी काँग्रेस फक्त तीन जागा गोवा फॉरवर्डला देत होते, तेही शेवटच्या क्षणी; मात्र राजकारणात धूर्त असलेले विजय सरदेसाई यांनी आम आदमी पक्षाला सोबत घेऊन 'गोवा फर्स्ट'च्या माध्यमातून तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले. काँग्रेसला आपली मनधरणी करण्यास भाग पाडले आहे. त्याचा परिणाम म्हणून गोवा फॉरवर्ड यावेळी किमान सहा ते सात जागा काँग्रेसकडे मागण्याची शक्यता आहे.