सिंहस्थासाठी हवा तेवढा निधी देऊ ! उपमुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis Nashik Sabha | आयटी पार्क, नाशिक- पुणे रेल्वेचा पुनरुच्चार
Devendra Fadnavis Nashik Sabha
नाशिक : महायुतीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : गत सिंहस्थ कुंभमेळ्यात भरीव निधी देऊन नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचे काम युती सरकारने केले. नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळा संपूर्ण देशात उत्तम झाला पाहिजे. सिंहस्थानिमित्त कोट्यवधी साधू-महंत, भाविक याठिकाणी येतात. त्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी जेवढा पैसा लागेल, तो सर्व महायुती सरकार देईल, असे अभिवचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानसभा निवडणुकीत 'वोट जिहाद'विरुद्ध मतांचे धर्मयुद्ध लढण्याची वेळ आता आली आहे. हिंदू आज जागला नाही, तर उद्या वाचू शकणार नाही. ही निवडणूक तीन उमेदवारांची नाही, तर अस्तित्वाची आहे. वोट जिहादचे नापाक इरादे दफन करू टाका. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

महायुतीच्या नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधील सीमा हिरे, नाशिक पूर्वमधील ॲड. राहुल ढिकले व देवळालीतील सरोज अहिरे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन व पदाधिकारी उपस्थित होते. २०१४ मधील सिंहस्थातील आठवण सांगताना तत्पूर्वीच्या काँग्रेसप्रणीत सरकारवर त्यांनी टीका केली. गत सिंहस्थाला निधी देण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने नाशिक महापालिकेवर जाचक अट टाकली होती. परंतु काँग्रेसचा पराभव करत राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप युती सरकारमध्ये मी मुख्यमंत्री असताना नाशिक- त्र्यंबकच्या सिंहस्थासाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचा निधी देऊन विकासकामांच्या माध्यमातून नाशिकचा चेहरामोहरा बदलला. आता पुन्हा कुंभमेळा येऊ घातला आहे. नाशिकचा हा कुंभमेळा देशात उत्तम झाला पाहिजे. यासाठी हवा तेवढा निधी सरकार उपलब्ध करून देईल, अशा शब्दांत फडणवीस यांनी नाशिककरांना आश्वस्त केले.

मध्यंतरीच्या अडीच वर्षांच्या मविआ सरकारने नाशिकमध्ये एकही काम उभारले नसल्याचा दावा करत मविआ सरकारने केवळ विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केल्याची टीका त्यांनी केली. रिंगरोड, समृद्धी महामार्ग, चेन्नई- सुरत महामार्ग यामुळे नाशिकमध्ये इंडस्ट्रियल इकोसिस्टीम तयार होत आहे. गत अडीच वर्षांत महिंद्राचा अडीच हजार कोटींचा विस्तारित प्रकल्प, पाच हजार कोटींचा रिलायन्सचा प्रकल्प आणला गेला. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने नाशिकमध्ये आयटी पार्क उभारले जाईल. यासाठी आवश्यक एअर कनेक्टिव्हिटीही आता उपलब्ध झाली आहे. लवकरच नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वे सुरू करत आहोत. त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचा ओघही वाढेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

तिन्ही आमदारांना कौतुकाची थाप

नाशिकमधील भाजपच्या तिन्ही आमदारांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत फडणवीस यांनी त्यांना कौतुकाची थाप दिली. आ. देवयानी फरांदे यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर स्टेडियम कॉम्प्लेक्स, मेळा बसस्थानकाच्या नूतनीकरणासह सुमारे 500 कोटींची विकासकामे करून मतदारसंघात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडविले. सीमा हिरे यांनी सिडकोची घरे फ्री होल्ड करण्यासाठी पाठपुरावा केला. आता सिडकोवासीयांना घरांची मालकी मिळणार आहे. पूररेषांचा प्रश्नही आपण सोडवत आहोत. अॅड. राहुल ढिकले यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ७० फुटी श्रीरामांची मूर्ती, उड्डाणपूल मंजूर करून मतदारसंघाचा विकास केला, असे नमूद करत तुम्हाला विकास करणारे लोकप्रतिनिधी हवेत की, दंगा घडविणारे, अंडरवर्ल्डशी पार्टनरशिप करणारे लोक? असा सवाल फडणवीस यांनी केला.

'वोट जिहाद'चे नापाक इरादे दफन करा...

राज्यात पुन्हा सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले जातील, योजना राबविताना भेदभाव केला जात नाही. मुस्लीम भगिनींनादेखील योजनेचा लाभ दिला जातो. परंतु दुर्दैवाने काही लोक समाजात वोट जिहादचे विष पेरत आहेत, असे सांगत राज ठाकरे यांच्या स्टाइलमध्ये 'लाव रे व्हिडिओ..' म्हणत मुस्लीम धर्मगुरू सज्जात नोमाणी यांचा व्हिडिओ फडणवीस यांनी सभास्थळी प्रसारित केला. भाजपला मत देणाऱ्यांवर बहिष्काराची भाषा केली जात असेल, तर वोट जिहादविरोधात मतांचे धर्मयुद्ध लढावेच लागेल. हिंदू आज जागला नाही, तर उद्या वाचू शकणार नाही. ही अस्तित्वाची निवडणूक असून अस्तित्व टिकवायचे असेल, तर भाजप महायुतीला मतदान करा. वोट जिहादचे नापाक इरादे दफन करून टाका, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news