

मालेगाव (नाशिक) : गिरणा धरण पांझण डाव्या कालव्यातून दोन आवर्तनांच्या पाणी आरक्षणास कायमस्वरूपी मंजुरी मिळाली. आमदार सुहास कांदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले. त्यामुळे पांझण डावा कालव्यांतर्गत येणार्या कळवाडी, देवघट, साकूर, नरडाणे, उंबरदे, चिंचगव्हाण व दापोरे या सात गावांना दोन आवर्तनांचे पाणी कायमस्वरूपी मिळणार असल्याने शेतकर्यांना मोठा लाभ होईल.
यापूर्वी आरक्षणाबाबत अनिश्चितता असल्याने जवळ धरण असूनही पिकांना पाणी मिळत नव्हते. या सातही गावांतील शेतकर्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची सिंचनासाठी दोन आवर्तनांची मागणी होती. हे ग्रामस्थांनी आमदार कांदे यांच्या निदर्शनास आणून दिली.
सिंचनाची निकड लक्षात घेऊन आमदार कांदेंनी पाठपुरावा केला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने शासन निर्णयाद्वारे 0.7589 द.ल.घ.मी. मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास मंजुरी देण्यात आली. यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या गावांना खेटूनच गिरणा धरण असूनही पाट कोरडा असल्याने वहन लॉसेसही होत होते. मुळातच या परिसरातील दोन-तीन ठरावीक गावे वगळता हा परिसर अवर्षणप्रवण क्षेत्रात आहे.
यापूर्वी पाटाला पाणी सोडल्यानंतर आमदार कांदे यांनी जलपूजन केले होते. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना या सातही गावांसाठी नियमित पाण्याच्या आवर्तनाचे आरक्षण मंजूर करून घेईन, असा शब्द दिला होता. त्याची पूर्तता झाल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये समाधान आहे. याबद्दल शेतकर्यांनी आमदार कांदे, ज्ञानेश्वर कांदे यांचे आभार मानले आहेत.