

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रगीत आणि वंदे मातरमचा अवमान हा देशाचा अवमान आहे. असा बेजबाबदारपणा हा देश कधीही सहन करणार नाही. काँग्रेसच्या केवळ एकाच घराण्याने देशासाठी त्याग केलाय का? सत्ता आणि खुर्ची भोगत ७० वर्षे देश चालवला, मग देशासाठी गोळ्या खालल्या म्हणून काय आता देश विकून खाणार का? असा सवाल कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित करत काँग्रेसवर हल्लाबोल केला.
तर, 'कंत्राटांमध्ये गैरव्यवहार असल्याचे आरोप करणाऱ्यांनी निविदा तपासाव्यात', असे प्रत्युत्तर राज ठाकरे आणि ठाकरे गटाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.१९) आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री महाजन यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला.
'वंदे मातरम्' सुरू असताना राहुल गांधी आणि सोनिया गांधी गप्पा मारत असल्याचे व इतर हालचाली करत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रगीत आणि वंदे मातरम्चा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशा वर्तनाला देश सहन करणार नाही, असे सांगत मंत्री महाजन यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांत 'गुजरातच्या ठेकेदारांना झुकते माप' दिल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना मंत्री महाजन यांनी थेट आव्हान दिले. काही मंडळी फक्त बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. कुंभमेळ्यातील सर्व निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि स्पर्धात्मक आहे.
बहुतांश कामांच्या निविदा या मूळ अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा २० ते ४२ टक्क्यांनी कमी दराने मंजूर झाल्या आहेत. आरोप करणाऱ्यांनी छातीठोकपणे बोलण्याआधी निविदांची कागदपत्रे आणि यादी तपासून पहावी, असा पलटवार त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी आमदार गोकुळ गिते उपस्थित होते.
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करणार असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केले.
सिंहस्थाची कामे ही केवळ चार महिन्यांच्या सोहळ्यापुरती मर्यादित नसून पुढील ३० ते ४० वर्षांच्या नाशिकच्या गरजा लक्षात घेऊन उभी केली जात आहेत, असे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले. रिंगरोड, भूमिगत युटिलिटी डक्ट, काँक्रिटीकरण आणि वाहतूक व्यवस्थेतील आमूलाग्र बदलांमुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल. मध्यवर्ती भागातील रस्त्यांसाठी लवकरच ५०० कोटी रुपयांच्या निविदा निघणार असून, साधुग्रामच्या जमिनीचा तिढाही शेतकऱ्यांना न्याय देऊन सोडवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.