

नाशिक : आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचे सांगितले जात असले, तरी महायुतीतील घटक पक्षांकडूनही स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत मिळत आहेत. यावर, भाजप नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची मानसिकता असल्याचे सांगितले. त्याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगत, महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांचा असणार असल्याचेही स्पष्ट केले.
जलसंपदामंत्री महाजन हे सोमवारी (दि. १३) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातग्रस्त स्थळाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेकडून अन्य पक्षांतील उमेदवारांना गळाला लावण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यावर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुती करायची की नाही यासंदर्भात अंतिम निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री घेतील. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही मानसिकताही स्वबळावर निवडणुका लढण्याची असून, तशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याबाबत, सर्वांशी बोलून निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव य़ांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर स्वार्थासाठी पक्ष सोडून बंडखोरी केली त्यांच्या पक्षप्रवेशावरही मंत्री महाजन यांनी भाष्य केले. विधानसभा निवडणुकीत अन्य ठिकाणी जाऊन पक्षाविरोधामध्ये ज्यांनी काम केले, बंडखोरी केली, विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांसाठी स्वकीयांना मारझोड करण्याचे प्रकार झाले. अशांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल. अन्य पक्षांतील कोणत्याही पदाधिकाऱ्यांला घ्यायचे असेल, तर आमदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. भाजपविरोधात काम करणाऱ्यांना आता कपडे झटकून आले म्हणून स्वीकारणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालकमंत्री नियुक्तीस होत असलेल्या विलंबाबाबत विचारले असता मंत्री महाजन यांनी याबाबत आठवडाभरामध्ये निर्णय होणार असल्याचे सांगितले. मात्र, यावर फारसे भाष्य न करता त्यांनी बैठकीच्या निमित्ताने मी पुन्हा येईन असे सांगितले. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची जबाबदारी माझ्या खांद्यावर असून पुढील आठवड्यापासून बैठकींचे सत्र सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.