

नाशिक : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन शनिवारी(दि.३) नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता खुटवडनगर येथील सिध्दी बॅंक्वेट हॉलमध्ये भाजप महानगर व ग्रामीण जिल्हा विस्तारीत कार्यकारीणीची बैठक होत आहे. नाशिक महापालिकेत रातोरात घडलेल्या ५५ कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याची तक्रार भाजप आमदार तसेच पदाधिकारीकाऱ्यांकडून महाजनांपुढे मांडली जाणार आहे.
आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या बदलीची चर्चा सुरू असताना बुधवारी रात्रीतून ५५ कोटींचे दहा भूसंपादन प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या प्रस्तावांना महासभा आणि स्थायी समितीची मागील दाराने मंजूरी घेत रातोरात भूसंपादनाच्या मोबदल्याचे धनादेशही वाटप करण्यात आले. गुरूवारी सकाळी हा सारा गैरप्रकार उघड झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने आयुक्त डॉ. करंजकर यांना घेराव घालत जाब विचारला पाठोपाठ भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील या भूसंपादनाला विरोध दर्शवित शासनस्तरावर चौकशीची मागणी केली. यामुळे भूसंपादन घोटाळ्याची गांभीर्य अधिकच वाढले आहे. भाजपाचे शहरातील तिन्ही आमदार व प्रमुख पदाधिकारी या भूसंपादन घोटाळ्याविरोधात आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा गैरप्रकार गेला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन नाशिकमध्ये येत असल्यामुळे आता भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून या भूसंपादन घोटाळ्याची तक्रार महाजनांपुढे मांडली जाणार आहे. तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असून शहरांमधील महत्त्वाच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्याचे सोडून जर अशा पद्धतीने अनावश्यक कामांवर निधी खर्च झाला तर विरोधक त्याचा निवडणूकीत मुद्दा बनवतील, अशी तक्रार महाजनांपुढे मांडली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
५५ कोटींच्या भूसंपादन प्रकरणात प्राधान्यक्रम डावलून प्रकरणे पुढे रेटली गेल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षभराच्या सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचा संदर्भ देऊन ७० कोटीपेक्षा अधिक भूसंपादन केले गेले. न्यायालयीन एकूण प्रकरणे किती होती व त्यामध्ये प्राधान्यक्रम का ठरवला गेला नाही या संदर्भात चौकशीची मागणी आता होत आहे. गेल्या ३० वर्षापासून ज्यांच्या जमिनी गेल्या मात्र एक रुपया मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
विकासकामांसाठी निधीची गरज असताना अनावश्यक भूसंपादनावर कोट्यवधींची उधळपट्टी करणे गैर आहे. महापालिकेमधील भ्रष्टाचार प्रकरणांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार आहे.
- देवयानी फरांदे, आमदार, भाजप