

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर, राम कदम यांच्या पाठोपाठ राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत पलटवार केला आहे. कुंभमेळयात स्नान करणे, ही अंधश्रद्धा नाही, ही आपली धार्मिक परंपरा आहे. राज ठाकरेंना हे वेगळे वाटत असेल. ठाकरेंनी जे म्हटले आहे, त्याबाबतीत आम्ही नक्कीच नाशिकमध्ये गोदावरीचे पाणी स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
मंत्री महाजन रविवारी (दि. 9) नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत कुंभमेळा आढावा बैठक झाली. तसेच त्यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा कामांची पाहणीदेखील केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली आहे. यावर विचारले असता मंत्री महाजन म्हणाले की, कुंभमेळा स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही. ही आपली श्रद्धाच आहे, धार्मिक परंपरा आहे. ही शेकडो वर्षांपासून चालत असलेली परंपरा आहे. याला धार्मिक महत्त्व आहे म्हणून येथे सर्व प्रदूषणच आहे, पाणीच दूषित आहे असे म्हणण्याचे कारण नाही. निश्चित काही अंशी पाणी दूषित होते. एकाच वेळी कोट्यवधी लोक आल्यानंतर तो प्रश्न उद्भवतो. नाशिकबाबतीत गोदावरीत दूषित पाणी येत आहे हे मान्य आहे. मात्र, ते येऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्यासाठी 1,200 कोटींचा एमएलटी प्लांट उभारत आहोत. गोदावरीचे पाणी शुद्ध करण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. कुंभमेळ्याच्या शाही स्नानात एक डुबकी मारणे ही सर्वांची श्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.
गंगा, गोदावरी आपली धार्मिक स्थाने आहेत. त्यास महात्म्य आहे. राज ठाकरेंना हे वेगळे मत वाटू शकते असा टोला त्यांनी यावेळी लगावला. ठाकरेंनी जे म्हटले आहे, त्याबाबतीत आम्ही नक्कीच विचार करू. आगामी नाशिकमधील कुंभमेळया दरम्यान गोदावरीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नाशिकमध्ये पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.