

नाशिक : राज्यात महायुतीची सत्ता येणार असून, मुख्यमंत्री महायुतीचाच होईल असे सांगत, मालेगाव मध्य वगळता उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकेल, असा दावा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांच्यावरील सादाभाऊ खोत यांची टिका समर्थनीय नाही. टोकाची टीका करू नये, असा सल्लाही महाजन यांनी खोत यांना दिला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी(दि.८) नाशिकमध्ये जाहीर सभा होत आहे. मंत्री महाजन यांनी गुरुवारी(दि.७) या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाजन यांनी राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात १४ नोव्हेंबरपर्यंत जवळपास १० सभा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण महायुतीच्या बाजूने होणार आहे. लोकसभेला विरोधकांनी घटना बदलाचा फेक नॅरेटिव्ह सेट केला. त्याचा फटका आम्हाला बसला. मात्र, यावेळी फेक नॅरेटिव्ह चालणार नाही असा दावा त्यांनी केला. धुळे लोकसभा मतदारसंघात पाच ठिकाणी भाजप उमेदवाराला लीड होते. परंतु, मालेगाव मध्य एकाच मतदारसंघात विरोधी मतदाराला दोन लाख मते मिळाल्याने निर्णय फिरला. परंतु, विधानसभेला मात्र आता असे होणार नाही असा दावाही त्यांनी केला.
नाशकात देवळाली मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार आमने सामने आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची जागा असतानाही शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिला आहे. त्यामुळे येथे तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असा खुलासा महाजन यांनी केला. महायुतीत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा सूचक इशारादेखील महाजन यांनी दिला.
शरद पवार यांच्यावरील टीका समर्थनीय नाही. प्रत्येकाने संयम बाळगावा, टोकाची टीका करू नये, असा सल्लाही महाजन यांनी सदाभाऊ खोत यांना दिला आहे. मालेगावमधील सहकारी बँकेतून काढण्यात आलेल्या पैशांबाबत चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.