

नाशिक : जिल्ह्यात विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून वेग घेऊ लागली आहेत. सध्या जिल्ह्यातील १,३९६ ग्रामपंचायतींपैकी ९३१ ठिकाणी घरकुलांसह इतर कामे सुरू असून, त्यावर ५१,१०८ मजूर कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे, केवळ १५ दिवसांपूर्वी मजुरांची संख्या अवघी ३२४ होती, ती आता थेट ५१ हजारांच्या घरात पोहोचली आहे. सध्या रब्बी हंगामातील शेतीची कामे संपल्यामुळे मजुरांचा ओढा रोजगार हमी योजनेच्या कामांकडे वाढला असून, पुढील काही दिवसांत ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने मनरेगाच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षातील १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे. जॉब कार्डधारक कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या कामांची मजुरी केंद्र सरकारकडून दिली जाते. राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे क्षेत्र वगळता सर्व जिल्ह्यांत ही योजना राबवली जाते. मनरेगाच्या माध्यमातून रस्ते, विहिरी, पाझर तलाव, नालाबांध (बांधबंदिस्ती), फळबाग लागवड, घरकुले आदी कामे करण्यात येतात. ३१ मार्च रोजी जिल्ह्यात केवळ ३१ कामे सुरू होती व ३२४ मजूर कार्यरत होते. मात्र १७ एप्रिल रोजी ९३१ कामांवर ५१,१०८ मजूर कार्यरत असल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक कामे घरकुल बांधकामांची आहेत.
रोजगार हमी योजनेअंतर्गत इतर कामांसाठीची मजुरी केंद्राकडून थकीत असली, तरी घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना प्राप्त झाल्यामुळे ही कामे जिल्ह्यात वेगाने सुरू आहेत.
जिल्ह्यातील आदिवासी भागांतील सुरगाणा व दिंडोरी तालुक्यांमध्ये सर्वाधिक मजूर कार्यरत आहेत. त्यापाठोपाठ पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यांचा क्रमांक लागतो. यंदा चांगला पाऊस झालेल्या नांदगाव, सिन्नर व येवला तालुक्यांमध्ये मात्र रोजगार हमीवरील मजुरांची संख्या तुलनेने कमी आहे.
उन्हाळ्यामुळे शेतीची कामे आटोपल्याने रोजगार हमी योजनेतील कामांना गती मिळाली आहे. लवकरच आणखी काही कामांना मंजुरी मिळून ती सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना कामे तातडीने सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून, त्यामुळे महिनाअखेरपर्यंत मजुरांची संख्या आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.