

सिडको (नाशिक) : अंबड औद्योगिक वसाहतीत घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे आणि काही ठिकाणी ती थांबत नसल्याने कचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक उद्योजकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. घंटागाडी अनियमित असल्यामुळे कचरा साठून राहतो. त्यामुळे दुर्गंधी पसरते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, चुंचाळे गावातील स्वच्छता कर्मचारी नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गावातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुुळे सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून, रोगराई वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, त्यांनी महानगरपालिकेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
घंटागाडीच्या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे आणि चुंचाळे गावात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. यावर तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. या दोन्ही भागांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीत काही भागांत घंटागाडी येत नाही. काही ठराविक कंपन्यांसमोर घंटागाडी उभी राहते, तर काही कंपन्यांसमोरून त्यांचा कचरा न घेता निघून जाते. याबाबत मनपा आयुक्तांकडे तक्रार केली आहे. घंटागाडीने सर्वच कंपन्यांसमोर उभे करून कचरा संकलित केला पाहिजे.
ललित बुब, अध्यक्ष, आयमा
अंबड औद्योगिक वसाहतीत सर्वच कंपन्यांसमोर घंटागाडी थांबली पाहिजे व कचरा संकलित केला पाहिजे.
डॉ. गोविंदकुमार झा, खजिनदार, आयमा
अंबड औद्योगिक वसाहतीत घंटागाडी नियमित सर्वच भागांत फिरली पाहिजे
जयंत जोगळेकर, उद्योजक
चुंचाळे गाव व परिसरात स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी मनपाकडे केली आहे.
भागवत आरोटे, माजी नगरसेवक
चुंचाळे गाव व परिसरात नागरी वस्ती झपाट्याने विकसित होत आहे. या गावात पूर्वी स्वच्छता कर्मचारी होता. त्यामुळे मुख्य रस्ते स्वच्छ होते. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर या भागात नवीन कर्मचारी नियुक्त केले नसल्याने रस्त्यालगत कचऱ्याचा ढीग तयार झाला आहे.
निवृत्ती इंगोले, सामाजिक कार्यकर्ते, चुंचाळे