

नाशिक : पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणात जून महिन्यातच 59 टक्के जलसाठा झाला आहे. हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत 42 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षी जून अखेरीस केवळ १७ टक्के जलसाठा होता. पहिल्या टप्प्यात पुरेसा साठा झाल्याने, यंदा मराठवाड्याची तहान भागवून नाशिककर जलसंपन्न राहतील, असा अंदाज बांधला जात आहे.
जिल्ह्याला २०२४ मध्ये दुष्काळाचे चटके सोसावे लागले होते. परिणामी, जून २०२४अखेर गंगापूर धरण समूहात केवळ १४.६३ टक्केच जलसाठा होता. जुलै ते आगस्टपर्यंत टंचाईचे ढग होते. त्यानंतर पर्जन्यमान सुधरून परिस्थिती पालटली होती. यंदा मात्र, मे महिन्यापासूनच अवकाळीच्या स्वरूपात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मे अखेरीसच गंगापूर धरणात ४४ टक्के, तर जिल्ह्याचा एकूण जलसाठा 25 टक्क्यांवर गेला.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जलस्तर उंचावण्यास प्रारंभ झाला. यातून मागील आठवड्यात शुक्रवार (दि. 20) पर्यंत हा साठा 65 टक्क्यांवर पोहोचला होता. जलस्तर नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोदावरी नदीला सातत्याने पूरपाणी वाहात आहे. दि. 24 जूनला गंगापूरमधून 6 हजार 162 क्यूसेक वेगाने विसर्ग करीत जलसाठा 59 टक्क्यांपर्यंत आणण्यात आला.
सध्या जिल्ह्यातील पालखेड धरण समूहात ३५.३१, ओझरखेड समूहात ३३.३२, दारणा समूहात ५४.२७, तर गिरणा खोरे धरण समूहात ३२.९० टक्के जलसाठा झाला आहे. जिल्ह्यातील लहान- मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये २८ हजार ४१० दलघफू अर्थात ४३.२७ टक्के जलसंचय झाला आहे. जो गतवर्षीपेक्षा ३५.६४ टक्क्यांनी अधिक आहे.
गंगापूर धरण समूह स्थिती
गंगापूर - ५९.२४
काश्यपी - ५६.५९
गौतमी गोदावरी - ३९.०८
आळंदी - ५०.८६
एकूण - 42.
दि. 1 जूनपासून नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत आठ हजार ८८४ दलघफू अर्थात साडेआठ टीमएसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. हे सर्व पाणी मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणाकडे रवाना झाले आहे.
नाशिक : गंगापूर धरणातून गोदावरी नदीत 1 हजार क्यूसेकने विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदेला पुन्हा पूर आला आहे. वाहनधारक, छोटे- मोठे विक्रेते, टपरीधारक, भाजीविक्रेते आदींनी सावधगिरी बाळगण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
सध्या गंगापूर धरणात 59 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण पाणीपातळीत वाढ होत आहे. सुरुवातीला धरणातून 1,760 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. त्यात 1 हजारने वाढ करून आता 2,720 क्यूसेक करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हादी पात्राबाहेर आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी (दि. 20) धरणपातळी 65 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने विसर्ग सुरू करण्यात आला. सुरुवातीला 1,160 क्यूसेक वेगाने सुरू करण्यात आलेला विसर्ग बुधवारी (दि. 25) 6 हजार 162 क्यूसेकपर्यंत नेण्यात आला. त्यामुळे गोदेला 5 दिवस पूर आला होता. त्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे विसर्ग कमी करून 1,760 पर्यंत खाली आणण्यात आला होता. सध्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरल्याने पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे 1 हजार क्यूसेकने विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदेला पूर आला आहे. गोदाकाठच्या नागरिकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.