

नाशिक : गणेशोत्सवाकरिता महिनाभर आधी ऑनलाइन परवानगी घेण्याचा दंडक महापालिकेने सार्वजनिक गणेश मंडळांना घातला असला, तरी गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येपर्यंत परवानगीचा घोळ यंदाही कायम राहिला आहे. परवानगीसाठी महापालिकेकडे ५९७ मंडळांचे अर्ज प्राप्त झाले असले, तरी कागदपत्रांची छाननी व स्थळ पाहणीअंती २६९ मंडळांनाच मंडप उभारणीची अधिकृत परवानगी मिळू शकली आहे. गणेशाची स्थापना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना अद्यापही ३२८ मंडळ परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या निर्देशांनुसार महापालिकेने गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाकरिता मंडप धोरण आखले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात या मंडप धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. या परवानगीसाठी उत्सवाच्या ३० दिवस अगोदर अर्ज सादर करण्याचे आवाहन सार्वजनिक मंडळांना करण्यात आले होते. महापालिकेसह पोलिस, वाहतूक शाखा, अग्निशमन आदी विभागांच्या परवानगीसाठी मंडळांकरिता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. प्राप्त अर्जांची पडताळणी करून तीन दिवसांत परवानगीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यानुसार शुक्रवारपर्यंत महापालिकेकडे तब्बल ५९७ अर्ज प्राप्त झाले होते. विविध विभागांच्या परवानग्या आणि कागदपत्रांच्या छाननीनंतर २६९ गणेश मंडळांना परवानगी मिळाली आहे. कागदपत्रांची अपूर्तता, पोलिस, अग्निशमन, वाहतूक शाखेचा ना हरकत दाखला याअभावी अद्यापही ३२८ अर्ज प्रलंबित आहेत. गणेश प्रतिष्ठापनेला आता अवघे काही तास शिल्लक राहिल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.
परवानगीसाठी सातपूर विभागातून सर्वाधिक १३६ मंडळांचे अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. त्याखालोखाल पंचवटीतून १२७, सिडकोतून ११०, नाशिक रोड ८५, नाशिक पश्चिम ८०, तर नाशिक पूर्व विभागातून ७१ मंडळांचे अर्ज दाखल झालेत. या अर्जांची छाननी शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
विभाग - मंडळांचे एकूण अर्ज - परवानगी दिलेले अर्ज
नाशिक पूर्व -७१ -२१
नाशिक पश्चिम -८० -१८
पंचवटी -१२७ -८८
नवीन नाशिक -११० -२९
सातपूर -१३६ -१८
नाशिक रोड -८५ -३३
एकूण -५९७ -२६९