नाशिकमध्ये अंगारकीनिमित्त सजली गणेश मंदिरे

Angarki Chaturthi 2024: आज अंगारकी चतुर्थी; विविध धार्मिक कार्यक्रम
Shri Navashya Ganapati
नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगापूर रोडवरील श्री नवश्या गणपतीची सजवण्यात आलेली आकर्षक मूर्ती भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे. (छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : अंगारकी चतुर्थीनिमित्त शहर-परिसरातील विविध गणेश मंदिरांवर आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. मंदिर समित्यांतर्फे आज मंगळवार (दि.२५) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

चालू वर्षातील दुसरी व अंतिम अंगारकी चतुर्थी मंगळवारी (दि. २५) रोजी आली आहे. या निमित्ताने शहर परिसरातील विविध गणेश मंदिरांमध्ये विविध आकर्षक फुलांची आरास व आकर्षक विद्युत रोषणाई भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. रविवार कारंजा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात (चांदीचा गणपती) येथे अंगारकीनिमित्त पहाटे 'श्रीं'च्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. मंदिर समितीतर्फे महाआरती व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Shri Navashya Ganapati
नाशिक : गंगापूर रोडवरील श्री नवश्या गणपती मंदिरात अंगारकीनिमित्ताने भाविकांनी लांबचलांब रांगा लावल्या आहेत.(छाया : हेमंत घोरपडे)

नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगापूर रोडवरील श्री नवश्या गणपती मंदिरातील गणेशमूर्ती आकर्षक तयारीमुळे भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. येथे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविक गर्दी करत असून लांबचलांब रांगा लावल्या आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी व्यवस्थापन समितीकडून विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या व्यतिरिक्त अशोकस्तंभ येथील ढोल्या गणपती, जुन्या नाशिकमधील मोदकेश्वर, उपनगरचा इच्छामणी आदी गणेश मंदिरांमध्येही अंगारकीसाठी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन असल्याने संध्याकाळपर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, शहरातील धार्मिक व सामाजिक संस्थांतर्फे यानिमित्ताने भजन-कीर्तन व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले असल्याने भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news