

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक गणेश गिते यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेताना गंभीर आरोप केला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी नाशकात दडपशाही करत असून, येथील व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा खळबळजनक आरोप गिते यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना गिते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांची आपण बुधवारी भेट घेतली.
या नेत्यांनी महायुती धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने, पक्षादेश मानून आपण उमेदवारी मागे घेत आहोत. आपल्या पक्षनेत्यांनी कोणत्याही पदाचा शब्द दिलेला नाही. मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून सुरू असलेल्या दडपशाहीची व्यथा आपण मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचे गिते यांनी सांगितले. ते म्हणाले की, नाशिकमध्ये गेल्या १-२ वर्षांपासून मला आणि माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जात आहे.
आमच्याच पक्षाचे काही लोकप्रतिनिधी हा त्रास देत आहेत. जर जनतेवर अन्याय होत असेल, तर जनता सुरक्षित कशी राहणार? आज शहरातील व्यापाऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे, त्यांना सर्रास ब्लॅकमेल केले जात असून ते प्रचंड त्रस्त आहेत, असा आरोप करत नाशिकमध्ये सुरू असलेली गुंडागर्दी, ब्लॅकमेलिंग आणि खोटे कागदपत्रे बनवण्याचे धंदे जोपर्यंत बंद होत नाहीत, तोपर्यंत नाशिकचा खरा विकास होऊ शकत नाही.
मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, त्यांनी स्वतः नाशिकमध्ये लक्ष घालावे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे गिते म्हणाले. गणेश गीते यांच्या या थेट आणि आक्रमक पवित्र्यामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत गृहयुद्ध आता चव्हाट्यावर आले आहे.
पोलिसांचा दोष नाही, लोकप्रतिनिधी गुन्हेगार पोसतात
गिते यांनी आपल्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर अत्यंत गंभीर आरोप करताना सांगितले की, पोलिस प्रशासनाचा यात कोणताही दोष नाही. दबंग पोलिस आयुक्त नाशिकची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला संकल्पना राबवली आणि दुसरीकडे काही लोकप्रतिनिधी गुन्हेगार पोसत आहेत. म्हाडा प्रकरणाचा उल्लेख करत ते म्हणाले की, माझा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसताना मला मानसिक त्रास देण्यासाठी यात गोवण्यात आले. इतकेच नव्हे तर शहरातील अनेक प्रामाणिक व्यावसायिकांनाही यात नाहक अडकवून त्यांची कोंडी करण्यात आली आहे.