

नाशिक : केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत येत्या सोमवारी (दि.१५) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्वाकांक्षी राम काल पथ प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, या प्रकल्पाच्या कामाला वेग आला असला तरी मार्च २०२६ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यादृष्टिने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाकांक्षी राम काल पथ प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. १४६ कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यटन विभागाने १०० कोटींचा निधी दिला असून राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित ४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथात असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला देखील प्रारंभ झाला आहे.
याअंतर्गत गोदाकाठ परिसरातील मंदिरांच्या रंगरंगोटीच्या कामांना प्रारंभ झाला असून, रामायणातील आकर्षक भित्तीचित्रे साकारण्यात येणार आहेत. पंचवटी, रामकुंड, गडकरी चौक परिसरातील हनुमान मंदिर, काळाराम मंदिर, तसेच गंगा घाटावरील प्राचीन देवस्थाने याठिकाणी रंगकाम, स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मंदिरांच्या भिंतींना भगवा आणि पिवळ्या रंगांच्या छटा देत पारंपरिक तसेच आकर्षक सजावट करण्यात येत आहे. रामकूंड, सीतागुंफा व काळाराम मंदिर परिसरात रामायणातील आकर्षक भित्तीचित्रे साकारण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मालेगाव स्टॅण्ड, इंद्रकुंड, काळाराम मंदिर, सीता गुंफा येथील प्रवेशद्वाराबरोबरच रामकुंड ते सरदार चौक ते काळाराम मंदिर ते सीता गुंफा येथे दगडी फरशा बसविण्यात येणार आहे.