

सिडको : महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जोरात सुरू आहे. आमदार सीमा हिरे याही आमची लाडकी बहीण असून, त्या मतदारसंघात राबवत असलेल्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आयटीआय पूल ते वावरेनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन खुटवडनगर येथे झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी नगरसेविका अलका आहिरे, माजी नगरसेविका सुवर्णा मटाले, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सीमा हिरे यांच्या विकासकामांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री शिंदे भाषणात म्हणाले की, या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला आमदार सीमा महेश हिरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे निधी मंजूर झाला. या प्रकल्पामुळे वावरेनगर आणि त्याबरोबरच्या परिसरातील रहिवाशांना वाहतूक सोयीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने वाहनचालकांना सुरक्षितता मिळेल. तसेच या कामामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार सीमा हिरे यांनी भाषणात, या प्रकल्पामुळे परिसरात सकारात्मक बदल घडेल. तसेच वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.