

सटाणा : सुरेश बच्छाव
जिल्हा रुग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे येथील चिमुकल्या कर्णबधिर बालकाला नवे आयुष्य मिळाले आहे. अतिशय खर्चिक असलेल्या परंतु शासकीय पाठबळातून मोफत होणाऱ्या कोक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेमुळे अशा वालकांच्या पालकांच्या आशांना आत्ता नवे बळ मिळाले आहे. या शस्त्रक्रियेनंतर या बालकाला ऐकू येऊ लागल्याने त्याच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे.
आपल्या मुलाला कधीच ऐकता येणार नाही अशी भीती मनात बाळगणाऱ्या पालकांसाठी जिल्हा रुग्णालय नाशिक व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा आशेचा आधार ठरत आहे. या कार्यक्रमांतर्गत कर्णबधिर बालकांवर वेळेवर निदान करून कोक्लियर इम्प्लांटद्वारे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. शहरातील अशाच ऋत्विक्ष सैंदाणे या अडीच वर्षीय बालकाला यातून श्रवणशक्ती मिळाली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांमध्ये मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. जन्मजात कर्णबधिरता, दृष्टिदोष, हृदयविकार, कुपोषण आदी आजारांचे लवकर निदान करून उपचार केले जातात. या तपासणीत अंगणवाडीतील बालकात कर्णबधिरता आढळून आली. या बालकाची सखोल तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी विभांडीक व डॉ. कृणाल मोरे यांनी केली. श्रवण चाचणीनंतर पालकांना समुपदेशन करून पुढील उपचारांची माहिती देण्यात आली.
सुरुवातीला पालक मानसिकदृष्ट्या खचले असले, तरी डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना दिलासा मिळाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचार प्रक्रियेसाठी सर्व वैद्यकीय कागदपत्रे व तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर नाशिक येथील इम्पर्टी हॉस्पिटल येथे तज्ज्ञ डॉक्टर डॉ. इंदोरवाला यांच्या नेतृत्वाखाली बालकावर कोक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
विशेष म्हणजे ही अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सहकार्याने पूर्णपणे मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बालकाची नियमित तपासणी सुरू असून, श्रवणविकास व भाषाविकासासाठी आवश्यक थेरपी दिली जात आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते योग्य वयात शस्त्रक्रिया आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे हे मूल भविष्यात इतर मुलांप्रमाणे ऐकू व बोलू शकणार आहे. यामुळे ऋत्विक्ष आता म्हणू शकेल, 'कहो ना प्यार है, हम सुनने तय्यार है...' या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच डॉ. इंदोरवाला व त्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजाविली. या उपक्रमामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील कर्णबधिर मुलांच्या आयुष्यात नवी दिशा मिळत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या बाळाला ऐकण्याचा नवा जीवनसूर मिळाला. इतकी महागडी कोक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया मोफत झाल्यामुळे आमच्यासाठी हे स्वप्नासारखे आहे.
रोशन सैंदाणे, बालकाचे वडील
कर्णबधिरता लवकर निदान झाल्यास कोक्लियर इम्प्लांटद्वारे बालकाच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. पालकांनी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभघ्यावा.
डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक