

Nirmala Gavit serious injury Hit and run case
सिडको: आरडी सर्कल परिसरात घराबाहेर नातवांसोबत फेरफटका मारत असताना इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. ही घटना सोमवारी (दि.२४) सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.
या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित या आरडी सर्कल येथे घराबाहेर नातवांसोबत फेरफटका मारत होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरात धडक दिली आणि चालकाने वाहनासह पसार झाला.
या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोऊनी हारुण शेख करीत आहेत.