चांदवड (नाशिक) : सरकारला सांगा शेतकऱ्यांचे होते नव्हते ते सगळ निसर्गाने मातीमोल केलं, आता आम्ही उदरनिर्वाह करायचा कसा... मागे कर्जमाफीची सरकारने घोषणा केली मात्र सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विसर पडला. कर्जमाफीसारखच शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत नुकसान झालेच नाही अस म्हणून शेतकऱ्याला पोरक नका करू... या आस्मानी संकटातून सावरण्यासाठी मायबाप सरकारने सरसकट कर्जमाफी देऊन हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
चांदवड तालुक्यात शनिवार (दि.27) व रविवार ( दि. 28) रोजी अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त भागाचीशिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी केली. यावेळी नारायणगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे आपल्याकडे व्यथा मांडली. आज मका, सोयाबीन पिक पूर्णतः पाण्याखाली असल्याने त्याला कोंब फुटले आहे. पर्यायाने या पिकापासून एक रुपया देखील उत्पन्न निघणार नाही. सर्व फेकून द्यावे लागणार आहे. खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेला. आता रब्बी हंगामात पिकांची लागवड करण्यासाठी पैसेच नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करायची कशी या चिंतेत बळीराजा सापडला आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे, नवनाथ निश्चित, तालुकाप्रमुख निलेश ढगे, सोपान मांदळे आदीसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
चांदवड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरित मदत केली जाईल.
भाऊसाहेब चौधरी, सचिव, शिवसेना शिंदे गट, नाशिक.