Farmer Fertilizer System | आता घरबसल्या नोंदणी करून वेळेत मिळणार खत

Farmer Fertilizer System | जिल्ह्यात खतांसाठी 'एफएफएस' मोबाईल ॲप आजपासून सुरू
Fertilizer
Fertilizer
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभतेने खत उपलब्ध व्हावे, दुकानांवरील गर्दी टाळावी आणि खत विक्रीत पूर्ण पारदर्शकता राहावी, यासाठी कृषी विभागाने खत विक्रीसाठी (एफएफएस) ही नवीन मोबाईल ॲप प्रणाली लागू केली आहे. गुरुवारपासून (दि. २७) ही यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येत आहे.

Fertilizer
Nashik Malnourished Children | नाशिक जिल्ह्यात 3,672 बालके कुपोषित; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्मूलनाचे कडक आदेश!

या ॲपमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या खताची आगाऊ नोंदणी (बुकिंग) करता येणार आहे. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या क्यूआर कोड किंवा टोकननुसार ठरलेल्या वेळेत थेट विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल.
एफएफएस प्रणालीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी व महसूल विभागामार्फत गावपातळीवर जनजागृती करण्यात आली आहे. विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ३२९ घाऊक व १,५०४ किरकोळ खत विक्रेत्यांचे प्रशिक्षण व आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे.

जमिनीच्या नोंदीबाबत अडचण असल्यास जमिनीची मालकी, वारसाहक्क, भाडेकरू, फेरफार किंवा जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्या व्यक्तीबाबत अडचण असल्यास संबंधित महसूल विभागाकडील नोंदी व प्रत्यक्ष परिस्थिती तपासून आवश्यक कारवाई करण्यात येईल.

असे घ्या एफएफएस प्रणालीतून खत

एफएफएस प्रणालीतून खत घेताना फार्मर आयडी किंवा उपलब्ध ई-केवायसी आधारच्या माध्यमातून ओळख पडताळणी करावी, आपल्या जमिनीची आणि सध्या घेतलेल्या पिकाची माहिती नोंदवावी, आपल्याला आवश्यक असलेले खत आणि त्याचे प्रमाण निवडावे, उपलब्ध सोसायटी किंवा अधिकृत खासगी खत विक्रेत्याची निवड करावी, यानंतर क्यूआर कोड / टोकन मिळवावा. ही बुकिंग पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर क्यूआर कोड / टोकन मिळेल. त्यानुसार ठरलेल्या वेळेत विक्रेत्याकडून खत घ्यावे.

Fertilizer
ICU NICU Safety Audit | अमरावती दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; सर्व रुग्णालयांना फायर अन् इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश!

शेतकऱ्यांना मिळणार हे फायदे

  • खताची आगाऊ मागणी नोंदविता येणार.

  • खतासाठी दुकानावर वारंवार जाण्याची गरज कमी होणार.

  • गर्दी व प्रतीक्षा वेळ कमी होण्यास मदत होणार.

  • कोणत्या विक्रेत्याकडे किती खत उपलब्ध आहे, यानुसार नियोजन करता येणार.

  • खत विक्रीची ऑनलाइन नोंद राहणार असल्याने पारदर्शकता वाढणार.

  • शेतकऱ्याला गरजेनुसार खताची मागणी करता येणार.

जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी खताची गरज असल्यास आगाऊ मागणी नोंदवून एफएफएस प्रणालीचा वापर करावा. बुकिंग केल्यानंतर मिळालेल्या क्यूआर कोड / टोकननुसार ठरलेल्या वेळेत खताची खरेदी करावी. एफएफएस प्रणाली वापरताना काही अडचण आल्यास शेतकरी बांधवांनी जवळचे सहायक कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

- रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news