

लासलगाव वृत्तसेवा - फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरताच निफाड तालुक्यासह परिसरात थंडीचा तडाखा वाढला असून किमान तापमान ६.७ अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे. ढगाळ वातावरण व बेमोसमी पावसामुळे वातावरणातून गायब झालेली थंडी पुन्हा परतायला सुरुवात झाली आहे.
वातावरणातील या बदलाचा फटका राज्यासह निफाड तालुक्यातील तापमानावर झाला आहे. परिणामी तापमानात कमालीची घट झाली आहे. अनेक जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा घसरत असतांना निफाडचे तापमान ६.७ अंश सेल्सिअस वर येऊन पोहचले असून या बोचऱ्या थंडीने मात्र नागरिकांना हुडहुडी भरली असल्याचे दिसत आहे.
महाबळेश्वर आणि लोणावळ्यासारखे तापमान निफाड तालुक्यात घटले आहे. दुसरीकडे द्राक्ष पंढरीत तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत.
यंदा हिवाळ्याची चाहूल उशीरा लागली असली तरी नोव्हेंबर अखेर थंडीने चांगलाचा जोर धरला होता. गेल्या चार दिवसांपासून फेंगल चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली होती मात्र फेंगलचा जोर ओसरताच तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तापमान कमी झाल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक शेकोट्यांचा आधार घेत आहे.