

नाशिक : सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबविली जात असून, याअंतर्गत भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच पनीर आणि खवा जप्त केल्यानंतर एक लाख ३५ हजार ७९० रुपये किमतीचा संशयास्पद तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. ११) प्रशासनाने नाशिकरोड येथील व्यापारी बँकेजवळील, आशानगर कॉलनी, भगवती निवास येथील रामदेव ट्रेडिंग कंपनीवर धाड टाकली. या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे तूप विक्रीसाठी असल्याच्या संशयावरून तुपाचा नमुना घेऊन उर्वरित ३१ हजार ३९० रुपये किमतीचे ४३ लिटर तूप जप्त करण्यात आले.
तसेच बुधवारी (दि. १७) नाशिकरोड, जय भवानी रोड येथील स्वामिनाथ ट्रेडर्स या पेढीतदेखील निकृष्ट दर्जाचे तूप विक्रीसाठी असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार प्रशासनाने धाड टाकून दोन नमुने घेतले. तसेच उर्वरित एक लाख चार हजार चारशे रुपये किमतीचे १४५ लिटर तूप ताब्यात घेतले. दरम्यान, तीनही अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवाल प्रलंबित आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच, संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई करण्यात येईल. अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, सहायक आयुक्त (अन्न) मनीष सानप, दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
आगामी सण- उत्सव काळात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यपदार्थ बाजारात दाखल झाले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.