Malegaon Case | न्याय मिळाला; पण चिमुकली हरवली..!

डोंगराळे बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना निकालानंतर अश्रू अनावर
Malegaon Case |
Malegaon Case | न्याय मिळाला; पण चिमुकली हरवली..!
Published on: 
Updated on: 

मालेगाव : न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा न्याय केवळ माझ्या चिमुकलीसाठी नाही, तर भविष्यात अशा घटनांना आळा बसावा, यासाठीही महत्त्वाचा आहे. वरच्या न्यायालयातही आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे, अशी भावना पीडितेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. निकालानंतर त्यांच्या एका डोळ्यात न्याय मिळाल्याचे समाधान, तर दुसऱ्या डोळ्यात चिमुकलीला गमावल्याचे दुःख दिसून आले. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चारवर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी विजय ऊर्फ शेखर संजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

याप्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांनी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी विजय ऊर्फ शेखर संजय खैरनारला अटक केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत वैद्यकीय, डीएनए, न्यायवैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले होते. घटनेनंतर सुमारे तीन आठवड्यांत ४२५ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अहवाल, डीएनए तपासणी आणि अन्य न्यायवैज्ञानिक पुराव्यांना या खटल्यात महत्त्व आले.

आरोपीला अटक झाल्यापासून तो कारागृहात आहे. नागरिकांमधील तीव्र संताप आणि न्यायालय परिसरातील संभाव्य गर्दी लक्षात घेता, सुनावणीच्या वेळी त्याला बहुतांश वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. अंतिम निकालाच्या वेळीही आरोपीची उपस्‍थिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविण्यात आली.

न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त

निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव न्यायालय परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे निकाल जाहीर झाला, त्यावेळी न्यायालयात उपस्थित होते.

पूर्ण तपास पथकाने अहोरात्र मेहनत घेत २१ दिवसांच्या आत ४२५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात एकूण २४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याने पथकाच्या मेहनतीचे सार्थक झाले.

यशवंत बाविस्कर, तपास अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news