Nashik News | मुलीचे लग्न पाच दिवसांवर असताना बापाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Nashik News
देवळा : मुलीचे लग्न पाच दिवसांवर आले असतानाच प्राथमिक शिक्षक असणाऱ्या बापाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना तालुक्यातील दहिवड गावात घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
रविवारी (दि .४) रोजी अंत्यविधी करण्यात आला. त्यावेळी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली. भाऊसाहेब जिभाऊ सोनवणे (वय ५५) असे या शिक्षकाचे नाव आहे. दहिवड (ता. देवळा) येथील भाऊसाहेब जिभाऊ सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील प्राथमिक शाळेत आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते आपल्या कुटुंबासह तेथे स्थायिक होते. त्यांची मुलगी अर्पिता हिचे ९ मे रोजी नाशिक जिल्ह्यातील मुलाशी लग्न निश्चित झाले होते. त्यामुळे त्यांची लग्नाची धावपळ चालू होती.
लग्न जवळ आल्याने गावाकडची मंडळीही जाण्याच्या नियोजनात होती. तत्पूर्वीच शनिवार (दि.३) रोजी दुपारी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांचा रक्तदाबही कमी झाला यामुळे चक्कर येऊन ते खाली पडले. ही घटना घरी झाल्याने त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बातमी कळताच कुटुंबीय, नातेवाईक आणि दहिवड येथील गावकऱ्यांवर शोककळा पसरली.
आनंदाने गजबजलेले घर अचानक शोकमय झाले. लग्नाच्या तयारीचा उत्साह एका क्षणात ओसरला. भाऊसाहेब सोनवणे यांच्यावर आज रविवार (दि.४) रोजी दहिवड गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नातू असा परिवार आहे. आळंदी म्हातोबा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचे शैक्षणिक कार्य, शैक्षणिक उठाव व इतर शैक्षणिक उपक्रम यात त्यांचे विशेष काम होते.

