Farmers protest in Nashik for milk price hike
नाशिक : दुध दरवाढ करावी या मागणीसाठी आंदोलन करताना कोंडाजी आव्हाड, किरण सानप, भगवान नागरे, रवी चकाेर व दुध उत्पादक शेतकरी. (छायाचित्र : हेमंत घाेरपडे)

Nashik | दुध दरवाढीसाठी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

अनुदान नव्हे तर निश्चित दर मिळावा अशी मागणी

नाशिक : दुधाला अनुदान नव्हे तर दरवाढ करावी या मागणीसाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. २९) आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले.

राज्य शासनाने शुक्रवारी (दि.२८) सादर केलेल्या अर्थसंकल्पात दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. शासनाच्या घोषणेविरोधात दुध उत्पादकांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोबत गायींदेखील आणल्या. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानूसार शासनाने जाहिर केलेला दुधाचा ३४ रुपये दर हा कागदावर आहे. प्रत्यक्षात अन्य राज्यांच्या तुलनेत २२ ते २७ रुपये इतकाच हा दर आहे. यासर्वात मोठे दुर्दैव म्हणजे देशात २ लाख टनापेक्षा अधिक दुध पावडरचा साठा असताना शासनाने १० हजार टन आयातीला परवानगी दिली. तसेच आयातीवरील शुल्कही माफ केल्याने दुधाच्या दरात आणखीन घट होईल, अशी भिती आहे. त्यामूळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा. दुधाला ४० रुपये दर देण्यात यावा. अनुदान नको तर निश्चित दर करावे. भेसळीच्या दुधावर कारवाई करावी. निवडणूका डोळ्यासमोर न ठेवता याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना राबवावी, आदी मागण्या करण्यात निवेदनातून करण्यात आल्या.

आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, किरण सानप, भगवान नागरे, रवी चकोर, वालिबा दराडे, सागर सावंत, शिवाजी मानकर, सूचरक करवंदे यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झाले.

logo
Pudhari News
pudhari.news