

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने, अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी चिंतेेत आहेत. त्यातच मंगळवारी (दि.१) पहाटेच्या सुमारास शहरातील इंदिरानगर, आडगाव, म्हसरूळ या भागासह सिन्नर, येवला तालुक्यासह मनमाड परिसरात तुरळक पाऊस झाला.
या पिकांना फटका - उन्हाळी कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा आदी.
अवकाळीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसणार आहे. सप्तश्रृंग गडावर सकाळी पाऊस झाल्याने भाविकांची धावपळ उडाली.
यंदा द्राक्षाचे उत्पादन चांगले झाले असून, द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय गहु काढण्याची लगबग जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. उन्हाळी कांदा देखील काढणीला आला आहे. अशात अवकाळी पावसाचा या रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने, तापमानात सहा ते सात अंश सेल्सीअसने घट झाली आहे. मंगळवारी कमाल तापमान ३३.४ अंश तर किमान तापमान २४.२ अंश नोंदवले गेले. त्यातच पहाटेच्या सुमारास तुरळक पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. दरम्यान नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांना पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस बरसण्याचा इशारा यापूर्वीच हवामान विभागाने दिला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असून, काही भागात गारपीटची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम मैदानी भागात उष्णतेची लाट अधिक दिवस टिकून राहू शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.