

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
अमळनेर तालुक्यातील टकरेखेड़ा परिसरात गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास पती-पत्नीने आपल्या दोन निष्पाप चिमुकल्या मुलींसह भरधाव रेल्वेखाली झोकून देत सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुनील अमृत भिल (वय ३३), त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि दोन लहान मुली अशी या दुर्दैवी कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टकरेखेड़ा शिवारातील रेल्वे रुळावर गुरुवारी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास हा प्रकार घडला.
भिल दाम्पत्याने कोणत्या तरी अनाकलनीय नैराश्यातून किंवा कौटुंबिक विवंचनेतून दोन्ही चिमुकल्यांना सोबत घेऊन थेट धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेचा वेग प्रचंड असल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
पहाटेच्या वेळी रेल्वे रुळाजवळ मृतदेह दिसून आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना खबर दिली.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. आत्महत्येमागे प्रेमसंबंधातून वाद हे कारण असल्याची चर्चा समोर आली आहे.