

नाशिक : राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या इंग्लिश व्हिस्कीवर बनावट लेबल लावत वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने माडसांगवी परिसरात सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत ६ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल, ६२४ दारूच्या बाटल्या आणि स्कोडा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एक फरार आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये दीपक दिनकर भोगे (३४, गणेश चौक, सिडको), अण्णा राजू गायकवाड (२७, रा. नांदुरनाका) यांचा समावेश आहे. आरोपी बनावट लेबल लावून राज्यातच अवैधरीत्या मद्य विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे तपासात समोर आले.
उत्पादन शुल्कच्या पथकाने ८ डिसेंबरला नाशिक - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील माडसांगवी येथे वाहन तपासणी मोहिम राबवली. यात संशयित स्कोडा कार (एमएच ४३ व्ही ५५६४) थांबवत तपासण्यात आली असता प्रतिबंधित मद्य आढळले. वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात निरीक्षक किशोर पाटील, भूषण वाणी, दुय्यम निरीक्षक द. बा. कोळपे, प्रविण देशमुख, सोनाली चंद्रमौर्या, सुनील दिघोळे, मंगलसिंग जाधव, राहुल जगताप, भालचंद्र वाघ, विरेंद्र वाघ यांनी सहभाग घेतला.
अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतूक यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९, व्हॉट्सॲप ८४२२००११३३, किंवा दूरध्वनी क्र. ०२५३-२३१९७४४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.