

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघडकीस येत असून, तब्बल 300 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचे कनेक्शन समोर आले आहे. या व्यवहारामध्ये पुण्यातील एका नामांकित बिल्डरसह आणखी चार जणांचा सहभाग असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे हे व्यवहार नाशिकमधील की पुण्यातील, याबाबत आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू असल्याने या व्यवहारांची नेमकी व्याप्ती काय, याचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणांकडून या व्यवहारातील पैशांचा स्रोत आणि त्याचे मार्ग याचा सखोल शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे आता आंतरराज्य आर्थिक गुन्हेगारीचे स्वरूप स्पष्ट होत असून, तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. दरम्यान, अशोक खरातने अध्यात्माच्या नावाखाली तब्बल 1500 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कल्पना खरातचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील न्यायालयात करण्यात आला आहे. यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या प्रकरणातील कथित ब्लॅकमेलर नीरज जाधव याचा ठावठिकाणा अद्याप लागत नसल्याने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महिला आयएएस अधिकारी अडचणीत
खरात प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक खोलात जात असून, या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट उच्चस्तरीय शासकीय अधिकार्यांपर्यंत पोहोचत आहेत. विशेषतः एका महिला आयएएस अधिकार्यांशी संबंधित कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून, संबंधित अधिकारी लवकरच पोलिस चौकशीच्या फेर्यात येण्याची चिन्हे आहेत.
देवदर्शनाच्या नावाखाली उघडली भक्तांची बनावट खाती
भोंदू अशोक खरातने देवदर्शनाच्या नावाखाली भक्तांकडून कागदपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, अशोक खरात भक्तांना धार्मिक स्थळांच्या भेटी, देवदर्शन किंवा धार्मिक पर्यटनासाठी केवायसी आवश्यक असल्याचे सांगत असे. त्यानुसार तो आधार कार्ड, पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेत असे.