Nashik News : वणीत आरोग्याशी खेळ! पिण्याच्या पाण्याच्या कालव्यात फेकली मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे

नागरिकांमधून तीव्र तीव्र संताप, कारवाई करण्याची मागणी
Nashik News
वणीत आरोग्याशी खेळ! पिण्याच्या पाण्याच्या कालव्यात फेकली मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे
Published on
Updated on

वणी : वणी शहरातील के.आर.टी. हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पुनेगाव डाव्या कालव्यात गुरुवारी (दि. ६) दुपारच्या सुमारास (एमएच १५ जीव्ही २८०९) या चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा स्रोत असलेल्या कालव्यातच मुदतबाह्य मालाची कथित विल्हेवाट लावल्याने नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप करत परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी या घटनेचे छायाचित्रे व व्हिडिओ चित्रीत केल्याचा दावा केला असून, संबंधित वाहनाचा क्रमांकही त्यामध्ये स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाहन क्रमांकाच्या आधारे संबंधित मालक, चालक तसेच विक्रेता अथवा एजन्सीचा शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

पुनेगाव डावा कालवा हा वणीसह परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असून, शेकडो एकर शेतीचे सिंचनही याच कालव्यातून केले जाते. अशा ठिकाणी मुदतबाह्य खाद्यपदार्थांची कथित विल्हेवाट लावल्यास पाण्याचे प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने अलीकडे मुदतबाह्य अन्नपदार्थांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केल्यानंतर काही ठिकाणी मुदतबाह्य मालाची घाईघाईने विल्हेवाट लावली जात असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात यापूर्वीही मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री होत होती का? असा प्रश्न उपस्थित होत असून, त्याचाही तपास करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे, पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता कालवा, नदी किंवा सार्वजनिक जलस्रोतामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा मुदतबाह्य वस्तू टाकणे हा गंभीर प्रकार मानला जातो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे घटनास्थळाची पाहणी करून संबंधित वाहन, मालाचा स्रोत आणि त्यामागील जबाबदार व्यक्ती अथवा एजन्सीचा शोध घ्यावा व दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या घटनेची माहिती मिळाली असून संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्ती अथवा संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
भुषण दंडगव्हान, शाखा अधिकारी, पुणेगांव धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news