Chowk traffic jam solution
चौक कोंडीतून मार्ग शोधणार तज्ज्ञpudhari photo

Nashik News : चौक कोंडीतून मार्ग शोधणार तज्ज्ञ

केंद्राच्या तज्ज्ञ सल्लागारांसमवेत पथक नाशिकला; महिनाभरात होणार संयुक्त सर्वेक्षण
Published on

नाशिक : शहरातील द्वारका, मुंबई नाका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता राज्य आणि केंद्र पातळीवर पोहोचला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या तज्ज्ञ सल्लागारांसमवेत महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व महापालिका वाहतूक सेलचे अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.

या अधिकार्‍यांनी बुधवारी (दि. 25) दिवसभर प्रमुख चौकांची पाहणी केल्यानंतर द्वारका आणि मुंबई नाका या दोन्ही चौकांमधील वाहतुकीचे एकत्रित सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात सर्वेक्षण पूर्ण करून आवश्यक उपाययोजनांचा विशेष प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.

द्वारका, मुंबई नाका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: आगामी सिंहस्थ काळात हा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी द्वारका चौकातील मध्यवर्ती सर्कल हटविले. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या ठिकाणची बेशिस्त वाहतूक व अतिक्रमणे काढण्याबाबत सूचना केल्यानंतर त्यानुसारही रस्ते मोकळे करण्यात आले.

चार दिवसांपूर्वी नागपूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री गडकरी यांच्यासोबत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत आ. फरांदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित रस्त्यावरील शहरातील प्रमुख वाहतूक कोंडीचा मुद्दा मांडला. त्याची गडकरी यांनी गंभीर दखल घेत बुधवारी आपल्या अधिकार्‍यांसह सल्लागारांचे पथक नाशिकमध्ये पाठवले. या पथकाने तपासणी केली असता द्वारका आणि मुंबई नाका या दोन्ही सर्कलचे अंतर सर्वसाधारणपणे 500 मीटर इतके आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंदिरानगर बोगद्यावर उपाययोजना

इंदिरानगर बोगद्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. यासह दादासाहेब फाळके स्मारक, राणेनगर चौक येथील अंडर पासच्या ठिकाणी वाहतुकीदरम्यान जाणवणार्‍या अडचणीदेखील सोडविण्यासाठी उपाययोजनांची शिफारस या सर्वेक्षणादरम्यान केली जाणार आहे.

चौकातील वर्दळीचा होणार सूक्ष्म अभ्यास

2016 मध्ये आयटीडीपीमार्फत महानगरपालिकेने शहराचा वाहतूक आराखडा तयार केला होता, मात्र त्यातील अभिप्रायानुसार अपेक्षित अंमलबजावणी अपूर्ण राहिली. आता राष्ट्रीय महामार्गावरील चौकांमध्ये वाहतूक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या चौकांमधून एका तासामध्ये किती वाहने जातात, वाहनांचे स्वरूप कसे, दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांची संख्या, वाहतूक कोंडीच्या वेळा आणि प्रामुख्याने येणार्‍या अडचणी यांचा अभ्यास करून उपाययोजनांचा अहवाल तयार केला जाणार आहे.

सर्वेक्षण कक्षेतील चौक

द्वारका, मुंबई नाका, अंबड एमआयडीसी, गरवारे, पाथर्डी फाटा, नवीन आडगाव नाका चौक, अमृतधाम चौक, रासबिहारी स्कूल, बळी मंदिर चौक, जत्रा चौक या चौकांमधील वाहतुकीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व महापालिका अधिकार्‍यांमार्फत शहरातील प्रमुख चौकांचे सर्वेक्षण करून उपाययोजनांसंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.

रवींद्र बागूल, कार्यकारी अभियंता, मनपा वाहतूक सेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news