

'विना सहकार नाही उद्धार' या वचनाप्रमाणे सहकार क्षेत्र (Co-operative sector) महाराष्ट्रात सर्वतोपरी मार्गक्रमण करीत असून, नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची घोडदौड वाखणण्याजोगी म्हणावी लागेल. जिल्ह्यात सातत्याने सहकारी बँकांचे जाळे विस्तारत असून, एकूण ४१ सहकारी बँकांच्या ३२० शाखांच्या माध्यमातून तब्बल सहा लाख ९२ हजार ९०० नाशिककर ग्राहकांना जोडण्यात या बँकांना यश आले आहे. नाशिककरांनीही या बँकांवर विश्वास दर्शवित तब्बल सात हजार ६८७ कोटी ३३ लाख ५३ हजार इतक्या रकमेच्या ठेवी ठेवल्या आहेत. (Co-operative sector expanded in Nashik district)
दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने सादर केलेल्या जिल्ह्यातील ४१ नागरी सहकारी बँकांच्या आढावा पुस्तिकेतून ही बाब समोर आली आहे. जिल्ह्यात दि. २२ सप्टेंबर १९२० मध्ये नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या रूपाने सहकारी बँकेने (Co-op. Cooperative Bank) पाय रोवले. पुढे १९८० पर्यंत ही संख्या २० पर्यंत पोहोचली. त्यानंतरच्या दशकात (१९८१ ते १९९०) मात्र एकही सहकारी बँक स्थापन होऊ शकली नाही. १९९१ ते २००० या दशकात तब्बल २० सहकारी बँकांनी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात उडी घेत नाशिकला राज्याच्या केंद्रस्थानी आणून ठेवले. पुढे २००० सालानंतर एकच लोकनेते आर. डी. आप्पा को-ऑप. सहकारी बँक नाशिकमध्ये स्थापन झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहकारी बँकांची संख्या ४१ इतकी असून, या बँकांची २०२२-२३ मध्ये 'अ' वर्ग सभासद संख्या सहा लाख ३७ हजार १९१ इतकी होती. २०२३-२४ या वर्षात त्यात सहा हजार ८३० ने वाढ होत सहा लाख ४४ हजार २१ वर पोहोचली आहे. तर नाममात्र सभासद संख्या २०२२-२३ मध्ये ५२ हजार ३५६ इतकी होती. २०२३-२४ मध्ये त्यात तीन हजार ४७७ ने घट होत ४८ हजार ८७९ वर आली आहे. ठेवीदारांची संख्या १५ लाख ४३ हजार ४१२ इतकी आहे. या ठेवीदारांकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षात सात हजार ११ कोटी ३० लाख ३३ हजारांच्या ठेवी ठेवल्या होत्या. २०२४-२५ मध्ये त्यात ६७६ कोटी तीन लाख २० हजारांंची वाढ होत ठेवींचा आकडा सात हजार ११ कोटी ३० लाख ३३ हजारांवर पोहोचला आहे. (Co-operative sector expanded in Nashik district)
गेल्या काही वर्षांतील सहकार क्षेत्राची घोडदौड समाधानकारक असली, तरी या रेसमधून काही बँका बादही झाल्या आहेत. त्यात अनेकांच्या ठेवी अडकल्या असल्या, तरी ज्या बँका रेसमध्ये टिकून आहेत, त्यांनी आपल्या ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नसल्यानेच सहकारी बँकांवरील नाशिककरांचा विश्वास वृद्धिंगत होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
२०२२-२३ या वर्षात जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या माध्यमातून तब्बल तीन हजार ८७४ कोटी सहा हजारांचे कर्ज वाटप केले असून, त्यात २०२३-२४ या वर्षात २५७ कोटी ६७ लाख ७५ हजारांची भर पडल्याने हा आकडा चार हजार १३१ कोटी ६७ लाख ८१ हजारांवर पोहोचला आहे. तर कर्जदारांची संख्या एक लाख ४४ हजार ९२२ इतकी असून, सभासद कर्जदार संख्या एक लाख तीन हजार २११ इतकी आहे. अग्रक्रम क्षेत्रासह दुर्बल घटकांसाठी बँकांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
सहकारी बँकांची थकबाकी हा चिंतेचा विषय असून, २०२४ मध्ये थकबाकीची रक्कम ३४१ कोटी २५ लाख ८१ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे ग्रॉस एनपीएच्या रकमेत ३९३ कोटी ८३ लाख ८९ हजारांची भर पडली आहे. नेट एनपीए शून्य टक्क्यांवर ठेवण्यात ४१ पैकी १९ बँकांना यश आले आहे. सद्यस्थितीत नेट एनपीएची रक्कम ८५ कोटी ३५ लाख ९६ हजार इतकी आहे.
आजही सहकारी बँका सर्वसामान्यांच्या गरजा भागवत आहेत. या बँकांकडून सुलभ आणि तत्काळ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. छोट्या व्यावसायिकांच्या गरजा भागवण्याचे काम या बँका करत असून, त्यामुळे विकासाला आणि शहराच्या समृद्धीला चालना मिळत आहे.
विश्वास ठाकूर, अध्यक्ष, सहकारी बँक्स असोसिएशन, नाशिक.