

नाशिक : सतीश डोंगरे
एव्हरेस्ट शिखरापासून ते अत्यंत खोल महासागरच्या तळापर्यंत प्लास्टिक पोहोचले असून, आपली वसुंधरा दुषित करण्यात प्लास्टिकच सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. एखाद्या विषाप्रमाणे प्लास्टिक प्रदूषणाचा वसुंधरेसह मानवी जीवनावर मोठा विपरीत परिणाम होत असल्याने, 'प्लास्टिकचा वापर टाळा' असे वारंवार सांगून देखील, सर्रासपणे वापर सुरूच असल्याने 'आता मानवाला देवानेच सुदबुद्धी देवो' या भावनेतून प्रशासन आदिमायेच्या दारात पोहोचले आहे. राज्यातील शक्तीपीठांसह, अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, देवस्थाने याठिकाणी प्रशासनाकडून प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे.
येत्या गुरुवारी (दि.५) साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाची यंदाची 'जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण निर्मुलन' ही थीम असून, त्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यभरातील प्रमुख देवस्थानांच्या दरबारात प्लास्टिक मुक्तीसाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. यापूर्वी देखील प्लास्टिक मुक्तीसाठी प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. मात्र, वापर वाढतच असल्याने, आता देवाच्या दरबारीच प्लास्टिक मुक्तीचा जागर घालण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील प्रमुख देवस्थानांबाहेर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती केली जात आहे. देवस्थानस्थळी येणाऱ्या भाविकांना प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली जात आहे. तसेच कापडी पिशवी वापरासाठी उद्युक्त केले जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या तोंडून प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम भाविकांना सांगितले जात आहेत. तसेच व्यापाऱ्यांनाही 'मी प्लास्टिक पिशवी देणार नाही' अशी शपथ घ्यायला लावली जात आहे. देवस्थान परिसरातील मार्केटपासून ते पहिल्या पायरीपर्यंत 'वॉकिंग रॅली' काढली जात आहे. परिसरात बॅनल लावले जात आहेत. याशिवाय पथनाट्यातूनही जनजागृती केली जात आहे. हा उपक्रम राज्यभरातील धार्मिकस्थळी राबविला जात असल्याने, भाविकांमध्ये प्रभावी जनजागृती होईल, अशी अपेक्षा प्रशासनास आहे.
स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिकेतील कर्मचारी, तेथील प्रतिष्ठीत नागरिकांना सोबत घेवून प्लास्टिक निर्मुलनासाठी जनजागृती केली जात आहे. त्यास भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच प्लास्टिकएेवजी कापडी पिशव्या वापरावर भर द्यावा, यासाठी प्रशासनाकडून कापडी पिशव्यांचे वाटपही केले जात आहे.
प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ