

उगांव; पुढारी वृत्तसेवा : शेतीत राबता राबता शिक्षण घेतले शिक्षण घेऊन अभियंता झाले मात्र गावगड्याने आपला व्यायामाचा कित्ता काही सोडला नाही. कधी सायकलवरुन नाशिक ते सोनेवाडी खुर्द तर कधी ओढे नाले विहिर तलावात पोहण्याचा सराव अन् धावण्याचा सराव. निफाड येथील सोनेवाडी खुर्दचे विलास सानप या अभियंता असलेल्या शेतकरी पुत्राला इटलीत थेट आयर्नमॅन किताबाला गवसणी घालण्यास पोषक ठरला आहे.
निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथील विलास सानप यांनी इटली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत विलास सानप यांनी सुमारे 3.8 किमी समुद्री पोहणे पार करत लगेच 180 किमी सायकल चालविण्याचा स्पर्धात्मक टप्पा पार केल्यानंतर 42.2 किमी पायी धावणे असे सर्व 226 किमी अंतर विक्रमी वेळेत 14 तास 45 मिनिट 57 सेकंदात पूर्ण केले. ही स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण केली त्यांबद्दल त्यांना आयर्नमॅन या किताबाने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे
नियमित सरावातुन कोणतेही आव्हान सहजगत्या पार करता येऊ शकते हे कृषीप्रधान देशातील माझ्यासारख्या शेतकरी पुत्राने दाखवुन दिल्याचा मला अभिमान आहे.
-विलास सानप, सोनेवाडी खुर्द ता. निफाड