

निफाड (नाशिक) : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त रविवारी (दि. 14) ऊर्जा बचतीचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी आणि जनजागृतीच्या उद्देशाने वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षक गोरख सानप यांनी अनोखा उपक्रम राबषवला.
‘मी ऊर्जावीर सन्मान’ या उपक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातील वीज वापरलेल्या युनिट्समध्ये मागील महिन्याच्या तुलनेत सर्वात जास्त बचत केली त्या विद्यार्थ्यांचा ‘मी ऊर्जावीर’ म्हणून सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांसह पालकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. घरातील अनावश्यक विजेची उपकरणे बंद करत वीजबचत करण्यावर भर देण्यात आला. जेणेकरून वीजबिल कमी होईल.
जनजागृती आणि संदेश विद्यार्थ्यांनी घोषणा फलकांच्या माध्यमातून ऊर्जा बचतीचे महत्त्वाचे संदेश दिले. विजेची बचत काळाची गरज. सौरऊर्जेचा वापर करा. एलईडीचा वापर करा. विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती. मी वीज वाचवणारच. ऊर्जा वाचवा, देश वाचवा. यावेळी सूर्य, वारा, पाणी यांसारख्या अक्षय ऊर्जास्रोतांची माहिती देऊन ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करण्यात आली. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष वि. दा. व्यवहारे, सचिव रतन वडघुले, विश्वस्त आणि गटशिक्षणाधिकारी विलास साळी या उपक्रमाचे यांनी कौतुक केले.
वीज बचतीसाठी करावयाचे उपाय
गरज नसताना दिवे, पंखे, टीव्ही इतर उपकरणे बंद ठेवावे.
ऊर्जेची बचत करणारी ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ची उपकरणे वापरावी.
सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा.
एलईडीसारख्या पर्यायांचा वापर करावा.
सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा.
काम करत नसताना संगणक पूर्ण बंद ठेवावा.
फ्रीज वारंवार उघडू नये.
मोबाइल चार्ज झाल्यावर मुख्य बटन बंद करावे.
गावी निघण्यापूर्वी सर्व बटणे बंद केल्याची खात्री करावी.
विजेची बचत काळाची गरज झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने भारनियमनाचा सामना करावा लागतो. घरातील वीज उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवत बिलात केलेली बचत म्हणजे चिमुकल्यांनी ऊर्जा बचतीत उचललेला खारीचा वाटाच म्हणावा लागेल.
वि. दा. व्यवहारे