

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आली. राज्यभरातून आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९४३ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे.
तब्बल शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधून प्रवेश वाटपाची स्थिती तपासून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा. ज्या विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन संमती नोंदवावी व निर्धारित कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रमातील इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असेल त्यांनी पुढील फेरीची प्रतीक्षा करावी. इन-हाउस, अल्पसंख्याक व केंद्रीय कोट्याअंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाही संबंधित नियमांनुसार प्रवेशाची संधी उपलब्ध राहणार आहे.
या कोट्यांतील प्रवेश निश्चित करण्यासाठी २९ मे ते ३ जून २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत संधी मिळणार असून, त्यांनी भाग-२ मध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करणे आवश्यक आहे. शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी व पालकांना एसएमएसवर अवलंबून न राहता अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून माहिती पडताळण्याचे आवाहन केले आहे.