

नाशिक: आसिफ सय्यद
शासनाच्या ऊर्जा धोरण २०१७ अंतर्गत शहरातील पथदिपांकरीता पीपीपी तत्वावर राबविलेला स्मार्ट स्ट्रीट लायटींग प्रकल्प नाशिक महापालिकेसाठी वरदान ठरला आहे. शहरातील तब्बल एक लाख पाच हजार पथदिपांवरील सोडीअम दिवे बदलून लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमुळे गेल्या साडेचार वर्षांत महापालिकेच्या वीज खर्चात तब्बल १३०.७२ कोटींची बचत झाली आहे.
वीज बचतीचा हा दर ६० टक्के असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. वीज खर्चात झालेल्या बचतीचा ९५ टक्के हिस्सा प्रकल्प राबविणाऱ्या टाटा प्रोजेक्टस् कंपनीला अदा करण्यात आला असून या प्रकल्पावर एकही रुपया खर्च न करताही रॉयल्टीपोटी महापालिकेच्या पदरात ६.५३ कोटी रुपये पडले आहेत.
महापालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीतून(पीपीपी) शहरातील पथदीपांवरील सोडीअम दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प टाटा प्रोजेक्टस् कंपनीमार्फत राबविण्यात आला आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हा प्रकल्प पूर्णत्वास आला. सुरुवातीला एस्को खाते, पारंपरिक ऊर्जेवर होणाऱ्या खर्चाइतकी रक्कम एस्क्रो खात्यावर जमा करणे, विद्युत खांब बदलणे, गंजलेल्या पोलचा हिशेब न लागणे आदी कारणांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. दिरंगाईमुळे मक्तेदार कंपनीला दंडही करण्यात आला होता. अखेर शहरातील एक लाख पाच हजार पथदीपांवर वीज बचत करणारे स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. डिसेंबर २०२० पासून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. पथदिपांवरील जुन्या फिटिंगच्या वॅटेजप्रमाणे गेल्या तीन वर्षात महापालिकेला सुमारे २७० कोटींचे वीज देयक अदा करावे लागले असते. एलईडी फिटींगमुळे मात्र केवळ १३० कोटींचा वीज खर्च झाला आहे. टाटा प्रोजेक्टस् कंपनीसमवेत झालेल्या करारानुसार वीज बचतीच्या रकमेतून महापालिकेला ५ टक्के रॉयल्टीपोटी ६.५३ कोटी रुपयांचा हिस्सा मिळाला आहे. प्रकल्प साकारणाऱ्या टाटा प्रोजेक्टस्ला १२४ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.
पीपीपी तत्वावर स्मार्ट लायटींग प्रकल्पाची अंमलबजावणी
टाटा प्रोजेक्टस्मार्फत शहरात १.०५ लाख पथदीपांवर एलईडी दिवे
सोडीअम दिव्यांमुळे मनपाला वार्षिक ५५ ते ६० कोटींचे वीज बिल
एलईडी दिवे बसविल्यामुळे वार्षिक वीज खर्च २५ कोटींवर
एलईडी दिव्यांमुळे वार्षिक सरासरी ६० टक्के वीज बचत
पथदिवे दुरूस्ती साहित्य खरेदीतही वार्षिक अंदाजे ४ ते ५ कोटींची बचत होत आहे. पथदिप दुरूस्तीसाठी वापरात असलेल्या वाहन खर्चातही वार्षिक अंदाजे १ कोटींची बचत होत आहे. स्मार्ट लायटींगच्या देखभाल दुरुस्तीसाठी कमांड कंट्रोल रूम स्थापीत करण्यात आली आहे. पथदीपांच्या देखभाल-दुरुस्तीवर होणाऱ्या खर्चापोटी गेल्या साडेचार वर्षात महापालिकेच्या सुमारे २५ कोटींची बचत झाली आहे.
पथदीप चालु-बंदची माहिती एका क्लीकवर अॅपद्वारे मिळते. नागरिकांना अॅपद्वारे पथदीवे तक्रार नोंदविता येते. गेल्या साडेचार वर्षांत तब्बल एक लाख १८ हजार ४८८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत १११ तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारींचे निराकरण सर्व्हीस लेवल प्रमाणे वेळेत पूर्ण होते, असा दावा महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे करण्यात आला आहे.
गेल्या साडेचार वर्षांपासून हा प्रकल्प सुरळीत सुरू आहे. या प्रकल्पात महापालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नाही. रस्त्यावर राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे प्रकाशाची तीव्रता निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचे त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडीट केले जात आहे.
अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता, विद्युत, नाशिक महापालिका, नाशिक.