

नांदगाव : तालुक्यातील बाणगाव बुद्रूक येथील युवा शेतकऱ्याचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याची घटना गुरुवारी (दि. २४) रात्री घडली. विकास ज्ञानदेव कवडे (३२) असे त्याचे नाव आहे. ते रात्री १२ वाजता आपल्या शेतात पाणी देण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागला.
विकास कवडे हे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मापारी म्हणून कामाला होते. ते गुरुवारी रात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. परंतु, सकाळपर्यंत घरी परतले नाहीत. तेव्हा मोठा भाऊ शेतात गेला. त्याला विकास निपचित पडलेले दिसले. त्यांना नांदगाव रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. विकासच्या पश्चात पत्नी, मुलगा (६), मुलगी (३), आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
विकास हे मापारीकाम करतानाच वडिलोपार्जित शेती कसत होते. सध्या शेतात कांदालागवड सुरू आहे. दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने शेतात ओलावा राहावा म्हणून रात्री तुषार सिंचनद्वारे पाणी देऊन सकाळी पुन्हा कामावर जातो, असे सांगून विकास कवडे शेतात गेले होते. मात्र ते परतलेच नाही. विद्युत पंप सुरू करताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला.