

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2022 मध्ये व्हायला पाहिजे होत्या. मात्र, आता 2025 उजाडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तयारीला लागा असे आदेश त्यांनी पक्ष कार्यकार्यकर्त्यांना यावेळी दिले.
यावेळी राज्यासह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी सुरू आहे. सर्व अधिकारांना सूचना देऊन नुकसानाची माहिती मागवतो. कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यावर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती घेऊन मदतीबाबत निर्णय घेऊ असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री पवार रविवारी (दि.18) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी कळवण तालुक्यात शेतकरी मेळावा तसेच इतर कार्यक्रम घेतले. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्पटेंबर-ऑक्टोंबर महिन्यात घेण्याच्या सूचना केल्याची माहिती दिली. राज्यात सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत समित्या, जिल्हा परिषदा उभारल्या. त्या माध्यमातून पुढे आलेले नेतृत्व हे राज्यात आणि देशात विविध पदापर्यंत पोहोचल्याचे पाहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात निवडणुका घ्या, असे निर्देश दिल्याचा संदर्भ त्यांनी यावेळी दिला. यावेळी आमगार नितीन पवार, हिरामण खोसकर आदी उपस्थितीत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असेही त्यांनी म्हटले. पूर्वीप्रमाणेच ओबीसींना 27 टक्के आरक्षणाच्या जागा राखीव असणार आहेत. त्यामुळे, या निवडणुकांमध्ये विविध कार्यकर्त्यांना उभारी मिळेल. त्यांनी काम करुन दाखवावे, असे आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.