

नाशिक : विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या मतदारसंघात गेली वीस वर्ष 'भुजबळ पॅटर्न'च्या माध्यमातून विकासाची कामे करत आहोत. त्यामुळे कुणी निंदा करा, काहीही बोलले तर आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. केवळ मतदारसंघाचा विकास करणे हाच आपला एकमेव धंदा आहे. येणाऱ्या पुढील पाच वर्षांत मतदारसंघातील एकही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळांना दीड लाखांचे मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
येवला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले गट महायुतीचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीराम मंदिर खेडलेझुंगे येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भुजबळ यांनी यावेळी योगीराज तुकाराम बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. सभेच्या प्रारंभी महापुरूषांना वंदन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, मायावती पगारे, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, अरुण थोरात, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, डी.के.जगताप, प्रकाश दायमा, सुवर्णा जगताप, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, भाजप विधानसभा अध्यक्ष आनंद शिंदे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, जात धर्म पक्ष हे सर्व विकास हेच असून देशातील महापुरुष हे आपली दैवत आहे. या महापुरुषांनी जे विचार मांडले त्यांच्या विचारांवर आपण वाटचाल करतो आहे. महापुरुषांच्या विचारांवर शासन काम करत आहे. शिक्षण, महिला सक्षमीकरण, वंचितांना न्याय देण्याचं काम महायुती सरकार करत आहे. लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या रकमेत वाढ करण्यात येईल. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. महायुती सरकारने प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी योजना आणल्या आहेत. महायुती सरकार या योजना नियमित सुरू ठेवतील असे त्यांनी सांगितले.
येवल्याच्या विकासाला प्राधान्य असल्याचे नमूद करत भुजबळ म्हणाले की, पिंपळस ते येवला, लासलगाव विंचूर ते खेडलेझुंगे, रुई फाटा ते खेडले झुंगे रस्ता, लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालय ही कामे पूर्ण केली जातील. येवल्याच्या सिंचनासाठी आपण केवळ मांजरपाडा प्रकल्पावर थांबणार नाही. तर पुढे पार तापी गोदावरी लिंक योजनेतून अधिकचे ७ टीएमसी पाणी उपलब्ध होण्यासाठी पुढील काळात काम करू. योगिराज तुकाराम बाबा मंदिर परिसराचा अधिक विकास केला जाईल. शिवसृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण पुढे आणू, असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ हे राज्याचे नेतृत्व असल्याचे सांगत राज्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. येवला मतदारसंघात त्यांनी केलेला विकास अख्खा महाराष्ट्र बघत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रचाराला बळी न पडता विकासाला म्हणजेच भुजबळ यांना मत द्या, असे आवाहन त्यांनी केले. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना विक्रमी मतांनी निवडून द्यायचे आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, प्रकाश दायमा आदींची यावेळी भाषणे झाली.