

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दोनशेपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून दाखविण्याचा शब्द मी खरा करून दाखविला. 'एक बार कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता' अशी फिल्मी डायलॉगबाजी करत मला हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेणाऱ्यांचे काय होते ते अवघ्या महाराष्ट्राने बघितले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरेंबरोबर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनाही गर्भित इशारा दिला.
गद्दार, खोके असा आरोप करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेने खोक्यात बंद करून बाजूला फेकले. खरी शिवसेना कोणाची, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे जनतेने दाखवून दिले. त्यामुळेच त्यांचा जळफळाट होत आहे. दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते झालेल्या माझ्या सत्काराची काही लोकांना पोटदुखी सुरू झाली आहे, अशी घणाघाती टीकाही शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
आभार दौऱ्यानिमित्त नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेला बदनाम सावत्र भावांना विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी चांगलेच जोडे लगावले. महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून देत विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. गद्दार, खोके म्हणून हिणवणाऱ्यांना जागा दाखवून दिली. मोगलांच्या घोड्यांना जसे संताजी-धनाजी दिसायचे तसे आता यांना एकनाथ शिंदे दिसतोय. पोटदुखी दूर करण्यासाठी कंपाउंडरकडून औषधे घेतात म्हणून त्यांची पोटदुखी जात नाही, अशा शब्दांत उध्दव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावरही शिंदे यांनी टीकास्त्र डागले. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले लोक स्वत:ला 'चिफ मिनिस्टर' म्हणवत. मी मात्र स्वत:ला 'कॉमन मॅन' समजत होतो. आता डेप्युटी चिफ मिनिस्टर झाल्यानंतर स्वत:ला डेडिकेटेड कॉमन मॅन अर्थात जनसेवेसाठी समर्पित मानतो. एकनाथ शिंदे जेथे उभा राहतो तेथून लाइन सुरू होते, ही लाइन जनसेवेची आहे. विरोधकांनी माझी लाइन पुसण्यापेक्षा स्वत:ची लाइन मोठी करावी, तसे केले तर मी तुम्हाला सॅल्यूट करेन. परंतु काही लोकांची अवस्था म्हणजे 'सुंभ जळाला तरी पीळ जात नाही', अशी असल्याचे सांगत शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना चिमटा काढला. मी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा दावा करत शिवसेनेकडे अन्य पक्षातून सुरू असलेला प्रवेशाचा ओघ असाच सुरू राहील. माझ्याकडे येणाऱ्यांचे मी स्वागत करतो. पण तुम्हाला सोडून ते का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण तुम्ही केले पाहिजे, असा सल्लाही शिंदे यांनी ठाकरेंना दिला. यावेळी व्यासपीठावर मंत्री दादा भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, आ. सुहास कांदे, मीना कांबळी, ज्योती वाघमारे, माजी खासदार हेमंत गोडसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.
नाशिककरांनी शिवसेना आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिले. इतिहासात नोंद होईल, अशी कामगिरी केली आहे. त्यामुळेच नाशिककर मतदारराजाचे आभार मानायला येथे आलो आहे, असे नमूद करत माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. सिडकोची घरे फ्री होल्ड केली, आता नाशिककरांच्या वाढीव घरपट्टीचा प्रश्नही मार्गी लावला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
नाशिक ही सिंहस्थ भूमी आहे. २०२७ मध्ये येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. संस्काराचा वारसा जपणाऱ्या या कुंभमेळ्याच्या तयारीत शिवसैनिकांनीही सहभागी व्हावे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर सर्वांनी एकत्र येत भर द्यावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ नाशिकमधूनच फोडला होता. नाशिकच्या काळाराम मंदिरात स्वच्छता करत मंदिर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ नाशिकमधून केला गेला. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश लाभले. लाडक्या बहिणी, भावांनी आणि शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अशीच स्वच्छता करा. शिल्लक सेना (उबाठा) संपवा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
त्र्यंबकेश्वर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता त्या ठिकाणी ड्रोन उडवला जात असल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून ड्रोन उडवणारा व ड्रोन ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर शिंदे यांच्यासोबत असलेल्या ताफ्यातीलच फोटोग्राफर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करून त्यास सोडून दिले.